अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; जखमीवर सेवाग्राम येथे उपचार
By विलास गावंडे | Updated: October 2, 2022 13:41 IST2022-10-02T13:40:05+5:302022-10-02T13:41:05+5:30
यवतमाळ येथून हे तिघेही दुचाकीने देवी दर्शन करून गावी जात होते.

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; जखमीवर सेवाग्राम येथे उपचार
बाभूळगाव (यवतमाळ) : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून दोन युवक ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास नांदुरा गावाजवळ घडली. हे तिघेही एकाच दुचाकीवर धामणगावकडे जात होते. मयूर शंकरराव नेवारे (२६), प्रणव गजाननराव वानखडे (२४) अशी मृतांची नावे आहेत. रुद्र राऊत (१७) हा जखमी आहे. त्याच्यावर सेवाग्राम येथे उपचार केले जात आहे. हे तिघेही धामणगाव येथील भगतसिंग चौकातील आहे.
यवतमाळ येथून हे तिघेही दुचाकीने देवी दर्शन करून गावी जात होते. सकाळी ६ वाजताच्या सुमारास बाभूळगावपासून दोन किलोमीटर अंतरावर नांदुरा गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली. यात तिघेही कोसळले. मयूर शंकरराव नेवारे हा जागीच गतप्राण झाला. प्रणव गजाननराव वानखडे याचा सेवाग्राम येथे नेताना मृत्यू झाला. तिघेही युवक आपल्या आई-वडिलांना एकुलते एक होते. धामणगाव रेल्वे येथील भगतसिंग चौकात शेजारी राहत होते. बाभूळगाव पोलिसांनी अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश डांगे हे करीत आहे.