उपविभागात अनधिकृत खाणावळींना उधाण
By Admin | Published: June 6, 2014 12:14 AM2014-06-06T00:14:20+5:302014-06-06T00:14:20+5:30
वणी, मारेगाव झरजामणी तालुक्यात सध्या अनधिकृत खाणावळींना उधाण आले आहे. शासनाची परवानगी नसताना खाणावळी, हॉटेल मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.
वणी : वणी, मारेगाव झरजामणी तालुक्यात सध्या अनधिकृत खाणावळींना उधाण आले आहे. शासनाची परवानगी नसताना खाणावळी, हॉटेल मोठय़ा प्रमाणात सुरू आहे.
वणी, मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात परवाना प्राप्त मोजक्याच खाणावळी, रेस्टॉरंट व लॉजींग-बोर्डींंंग अस्तित्वात आहेत. त्यात वणी तालुक्य़ात सर्वाधिक खाणवळी आहेत. त्या खालोखाल मारेगाव व झरी तालुक्यात खाणावळी आणि रेस्टॉरंट आहेत. वणी तालुक्यात १0, तर मारेगाव व झरीजामणी तालुक्यात प्रत्येकी एक लॉजिंग व बोर्डींंग आहे. मात्र प्रत्यक्षात या तिनही तालुक्यात मोठय़ा प्रमाणात अनधिकृत खाणावळी, हॉटेल, नाश्ता, चहाची दुकाने अस्तित्वात आहे.
खाणावळ, चहा, नाश्ता आदी खाद्य पदार्थ विक्रीच्या ठिकाणी पाण्यासाठी मातीचे माठ, सिमेंटचे टाके, प्लॉस्टिकच्या डब्यांचा वापर केला जात आहे. त्यात पाणी साठवून तेच ग्राहकांना दिले जाते. यातील कित्येक व्यावसायीक पाणी साठवून ठेवण्याचे साहित्य हे भांडी धुण्याच्या ठिकाणी ठेवतात. तेथे अत्यंत गलीच्छ वातावरण असते. हे ठिकाण घाणीच्या विळख्यात असते. तेथेच पिण्याचे पाणी ठेवून ते ग्राहकांना दिले जाते. या अशुध्द पाण्यामुळे ग्राहकांचे आरोग्यच आता धोक्यात सापडले आहे.
हा सर्व प्रकार संबंधित प्रशासन उघड्या डोळ्य़ांनी पाहात आहे. मात्र एकाही अनधिकृत खाणावळ व्यावसायीकाविरुद्ध कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही. कुठेही आणि कोणतीही खाणावळ सुरू करण्यापूर्वी खाणावळ चालकास अन्न व औषध प्रशासनाची परवानगी, संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून वणी, मारेगाव व झरी तालुक्यात अनेक अनधिकृत खाणावळींचे पेव फुटले आहे.
या अनधिकृत खाणावळींमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो. तेथील शिळे व उरलेले अन्न उघड्यावर टाकले जाते. परिणामी परिसरात दुर्गंंंधी पसरते. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो. त्यांचे आरोग्यही धोक्यात सापडते. बहुतांश अनधिकृत खाणावळींमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळतो. जेथे खाणावळींचाच परवाना सतोत, तेथे दारू पिण्याचा परवाना त्यांना कुणी दिला, असा प्रश्न यामुळे निर्माण होतो.
हा सर्व प्रकार संबंधित प्रशासनाच्या मूक संमतीनेच सुरू आहे. या अनधिकृत व नियमबाह्य खाणावळींचा त्रास सर्वसामान्य जनतेला होतो. बहुतांश हॉटेल, खाद्य पदार्थांंंच्या दुकानांमध्येही अशुध्द पाण्याचा वापर होतो. हे सर्व चित्र उघड्या डोळ्यांनी बघूनसुध्दा प्रशासन अद्याप सुस्तच का आहे, हे एक कोडेच आहे. त्यामुळे जनतेत उलटसुलट चर्चा होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)