मारेगावात दर्जाहीन कामांचा सपाटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:13 PM2019-06-13T22:13:10+5:302019-06-13T22:14:00+5:30
शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आरोप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : शहराच्या विकासासाठी आलेल्या कोट्यवधींच्या निधीची नगरपंचायत प्रशासनाच्यावतीने उधळपट्टी सुरू असून विकासकामाच्या नावावर थातुरमातूर कामे करून हा निधी हडप होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहे. या विकासकामात कंत्राटदार व प्रशासनाचे साटेलोटे असल्याचाही आरोप आहे.
मारेगाव शहरातील ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळताच शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी नगरपंचायत प्रशासनाला प्राप्त झाला. या पैशातून शहरातील विकासकामांना नगरपंचायत प्रशासनाने सुरूवात केली. नगरपंचायत प्रशासनाने सुरूवातीच्या काळात कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले. परंतु हळूहळू गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत भराभर कामे उरकवून निधी उचलण्याचा सपाटाच सुरू केला आहे. आज शहरातील अनेक वॉर्डात खासगी कंत्राटदार व बांधकाम विभागाअंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम सुरू आहे. या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची आहे. यासंदर्भात कंत्राटदारांना विचारणा केल्यास ‘तुमच्याने जे होते ते करून घ्या’ अशा प्रकारचे उद्धट व अरेरावीची भाषा जनतेसोबत वापरली जाते.
वॉर्ड क्रमांक एकमधील नगरसेवक उमा देवगडे यांनी आपल्या वॉर्डातील बोगस कामाबाबत ठेकेदाराला विचारणा केली असता, त्यांनाही तसेच उत्तर देण्यात आले. शहरातील प्रत्येक कामाची तक्रार नगरपंचायतीकडे होत असताना नगरपंचायत प्रशासन जतनेच्या तक्रारीची दखलच घेत नाही. उलट कंत्राटदारावर कोणतीही कारवाई न करता त्यांची बिले अदा केली जात आहे.
आता तर शहरातील अनेक कामे ज्या कंत्राटदाराला देण्यात आली तो ती कामे न करता दुसऱ्याकडून कामे करून घेऊन बिले काढत आहे. गेल्या दोन महिन्यापासून नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रजेवर आहेत. त्यामुळे प्रभारावरच सर्व कामे सुरू आहे. प्रशासन व कंत्राटदार यांच्यात साटेलोटे असून जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. याकडे आता वरीष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष देण्याची गरज आहे.
अनावश्यक ठिकाणी कामे
शहरातील अनेक वॉर्डातील नागरिक रस्ते आणि नाली बांधकामाची मागणी करीत असताना त्याकडे दुर्लक्ष करून ज्याठिकाणी रस्ता व नालीची आवश्यकता नाही, अशा ठिकाणी थातुरमातूर कामे करून केवळ बिले काढली जात आहे.
कार्यालयीन कामेही खोळंबली
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे दीर्घ रजेवर गेल्याने आणि प्रभारी मुख्याधिकारी येत असल्याने जनतेची अनेक महत्वाची कामे होत नाही. नागरिक कामासाठी नगरपंचायत कार्यालयात गेल्यावर अर्धेअधीक कर्मचारी गैरहजर असतात. जे कर्मचारी उपस्थित राहतात, ते ‘साहेब नाही त्यामुळे तुमची कामे होणार नाही’ असे उत्तर देतात. त्यामुळे नागरिक कमालिचे हैराण झाले आहेत.