अवकाळी पावसाने गावरान आंब्याचा मेवा संपविला; मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरातवर भिस्त
By रूपेश उत्तरवार | Published: May 5, 2023 05:33 PM2023-05-05T17:33:44+5:302023-05-05T17:34:51+5:30
Yawatmal News मार्चपासून सुरू असलेल्या अवकाळीने विदर्भ आणि मराठवाड्यातील गावरान आंबा पूर्णत: गळून पडला आहे. यामुळे मे अखेरीस बाजारपेठेत दाखल होणाऱ्या गावरान आंब्याची चवही चाखता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
रुपेश उत्तरवार
यवतमाळ : अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यभरात धुमाकूळ घातला आहे. मार्चपासून सुरू असलेल्या अवकाळीने विदर्भ आणि मराठवाड्यातील गावरान आंबा पूर्णत: गळून पडला आहे. यामुळे मे अखेरीस बाजारपेठेत दाखल होणाऱ्या गावरान आंब्याची चवही चाखता येणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
भर उन्हाळ्यात संकरित आंबा आणि आंब्याच्या काही जाती बाजारात आहेत. कोकण, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकमधून राज्यभरात येणारा हा आंबा सध्या मोठ्या प्रमाणात बाजारात आला आहे. त्यातही मध्य प्रदेशातून आलेल्या लालबाग आणि बैगनपल्ली आंबा जास्त आहे. या आंब्याचे ५० रुपये किलोच्या घरात भाव आहेत. तर केसर आणि इतर आंब्याचे दर १०० ते १२० रुपये किलोच्या घरात आहेत. हापूस आंब्याचे दर यावर्षी ७०० ते २००० रुपये पेटीपर्यंत आहेत.
गावरान आंब्याच्या जातीचे जतनच नाही
मे महिन्यात गावरान आंबा बाजारात विकायला येतो. लाडू, खोबऱ्या, घोटी, शेवळ्या, लाल्या अशा नानाविध जातीत हा आंबा प्रत्येक गावात वेगळ्या नावाने विकला जातो. हापूस आंब्यापेक्षाही त्याची वेगळी चव असते; मात्र या आम्रवृक्षाचे जतन झालेले नाही. आंबा परिपक्व होऊन पिकण्याच्या अवस्थेत असताना मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यात हा आंबा पडला. आता झाडाला आंबाही शिल्लक राहिलेला नाही. यामुळे यावर्षी गावरान आंब्याची चव चाखायला मिळणार नाही अशी अवस्था आहे.
रसाळीची संकल्पना परप्रांतीय आंब्यावर
गावखेड्यातील शेतशिवारात शेत तिथे गावरान आंबा दिसतो. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या दोन्ही बाजूने असंख्य आंब्याची झाडे दिसतात. उन्हाळ्यात गावखेड्यात गेल्यावर रसाळी म्हणजे रसाचा बेत असलेले जेवण हमखास मिळते; मात्र या आंब्याच्या झाडांवर कुऱ्हाड चालली. राहिलेले वृक्ष अवकाळी पावसाने गारद झाले. यामुळे गावात यावर्षी पाहुणे आले तर परराज्यातून आलेल्या आंब्यावरच पाहुणचार करावा लागणार आहे.
खास लोणच्याचा आंबा दुरापास्त
एक पाऊस आल्यानंतर लोणच्याचा आंबा उतरविला जातो; मात्र अवकाळी पाऊस आणि वादळाने फळ शिल्लकच राहिले नाही. यामुळे मान्सूननंतर उतरविला जाणारा लोणच्याचा आंबा मिळणार नाही, अशी स्थिती आहे.
राज्यभरातून आंब्याची बुकिंग करण्यात येते. यावर्षी विविध जातीचे आंबे बुक केले; परंतु वादळाने आंबे गळाले. आता या ठिकाणावरून आंबा मिळेलच अशी शाश्वती नाही.
श्याम लापसेटवार, व्यापारी