बेकायदा टॉवर्सचा शहराला विळखा
By admin | Published: May 31, 2014 11:47 PM2014-05-31T23:47:32+5:302014-05-31T23:47:32+5:30
गेल्या आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवरने शहराला विळखा घातला आहे. मोबाईल फोनची सेवा देण्यासाठी हे टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानुसार नगर पालिकेची
पुसद : गेल्या आठ-दहा वर्षात मोबाईल टॉवरने शहराला विळखा घातला आहे. मोबाईल फोनची सेवा देण्यासाठी हे टॉवर उभारण्यात आले आहेत. हे टॉवर उभारण्यासाठी शासकीय धोरणानुसार नगर पालिकेची परवानगी आवश्यक असते, परंतु शहरातील बहुतांश टॉवर बेकायदेशीररीत्या उभे आहेत.
जेवढे अधिक टॉवर तेवढे चांगले नेटवर्क असे समीकरण असते. ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी मोबाईल कंपन्या मोक्याच्या जागा शोधून हे टॉवर उभारतात. एकेकाळी शहराच्या बाहेर असणारे हे टॉवर आता भरवस्तीतही उभारले गेले आहे. ज्या ठिकाणी हे टॉवर उभारले गेले आहेत, त्या परिसरात कर्करोग, स्मृतिभ्रंश होणे, सततची डोकेदुखी, अशक्तपणा, दृष्टी कमी होणे, रोगप्रतिबंधक शक्ती कमी होणे इत्यादी आजार उद्भवत आहे.
प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे. ग्राहकांची संख्या प्रचंड वाढल्याने त्यांना चांगली सेवा मिळावी या हेतुने अनेक कंपन्या स्पर्धेत उतरल्या. या सोबतच शहरात टॉवरची संख्याही वाढली. इमारतीवर टॉवर उभारण्यासाठी इमारतीच्या मालकाला दरमहा १0 ते १५ हजार रुपयांपर्यंत भाडे मिळते. या रकमेसाठी कोणत्याही स्वरुपाच्या दुष्परिणामांची पर्वा न करता टॉवरसाठी अनुमती दिली जाते. शहरातील मोबाईल टॉवर हे नगरपालिकेतील काही लोकांच्या कमाईचेसुद्धा साधन बनले आहे. पुसद शहरात किती टॉवर्स आहे, त्यांनी परवानगी घेत ली किंवा नाही, किती अधिकृत, किती अनधिकृत याचे रेकॉर्डसुद्धा नगर परिषदेकडे नाही.
प्राप्त माहितीनुसार अनधिकृत टॉवरचीच संख्या जास्त असल्याचे निदर्शनास येत आहे. रहिवाशी भागात झपाट्याने वाढणार्या मोबाईल टॉवरच्या जाळ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. टॉवरमधून निघणार्या रेडिओ लहरींमुळे शहरवासवीयांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. टॉवर उभारण्यासाठी राज्य सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत. परंतु याही नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. शहरातील अनेक टॉवर नियमबाह्य असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
मोबाईल टॉवरमधून निघणार्या रेडिओ लहरींमुळे आजार उद्भवत असल्याचे अनेक शहरांमध्ये उघडकीस आले आहे. मुंबई ईस्टमध्ये ९१ मीटर परिसरात राहणार्या रहिवाशांना विविध प्रकारचे कर्करोग झाल्याचे निदान झाले आहे. पक्षी टॉवरच्या परिसरात क्वचित दिसतात, कारण अतीदाबांच्या लहरीमध्ये कमी वजनाच्या पक्ष्यांच्या शरीरातील तापमानवाढ होत असल्याचेही उघड झाले आहे.
त्यामुळे चिमण्यांचे अस्तित्व शहरी भागांमधून नष्ट झाले आहे. गुरगांव दिल्लीमध्ये तर चार टॉवर असलेल्या परिसरामधील फळझाडांना येणार्या फळांचे उत्पादन ९५ टक्क्यांनी कमी झाले आहे. हे सर्व प्रकार पुढे येत असले तरी भारतीय शास्त्रज्ञांकडून मोबाईल लहरींवर अद्याप एकमत नाही. एम.टेक., बी.टेक. ला असलेले विद्यार्थी या मोबाईल टॉवर्समधून निघणार्या लहरींमुळे होणार्या दुष्परिणामांचा अभ्यास करीत आहेत.
पुसद शहराचे चटई क्षेत्र २ चौरस कि.मी.परिसरात आहे. शहरात २५ पेक्षा जास्त टॉवरची संख्या आहे. यामध्ये बीएसएनएल, आयडिया, व्होडाफोन, एअरटेल, रिलायन्स, युनिनॉर, टाटा आदि कंपन्यांच्या टॉवरचा समावेश आहे. अनेकांनी नगर पालिकेची परवानगी न घेताच टॉवर उभारलेले असले तरी निकष डावलून टॉवर उभारणार्यांची संख्या जास्त आहे. सुमारे २00 फूट उंचीच्या मोबाईल टॉवरमधून निघणार्या रेडिओ लहरी जमिनीत समांतर जात असल्या तरी त्या सिमेंट काँटिच्या भिंतींनाही भेदून आरपार जातात. तसेच त्या मानवी शरीरालाही भेदून जात असल्याने आजार होण्याची शक्यता असते. सोबतच मोबाईल टॉवर वातानुकूलित ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या जनरेटरमुळे परिसरामध्ये प्रदूषणात वाढ होते.
आरोग्यावर परिणाम
मोबाईल टॉवरमधील विद्युत चुंबकीय लहरींचा मानवी शरीरासोबत अधिक संपर्क आला तर कर्करोग, नकारात्मक विचारात वाढ होणे, सततची डोकेदुखी, स्मृतिभ्रंश होणे, दृष्टी कमी होणे, अशक्तपणा, थकवा येणे, मानसिक तणावात वाढ होणे, रोगांशी लढण्याची प्रतिकारक्षमता संपते. निद्रानाश संभवतो, प्रजननक्षमता बाधित होते, लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चिमण्या-मधमाश्यांवर परिणाम
टॉवरचा परिणाम मधमाशा व चिमण्यांवर झाला असून शहरातील चिमण्या नामशेष झाल्याचे चित्र आहे. त्यासाठी हे मोबाईल टॉवरच कारणीभूत असल्याचा अंदाजही तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. (वार्ताहर)