आठ हजार हेक्टरला अवकाळीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 05:00 AM2021-12-30T05:00:00+5:302021-12-30T05:00:30+5:30
यवतमाळ शहरासह सात तालुक्यात मंगळवारी सायंकाळी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका बाभूळगाव, नेर, कळंब, दिग्रस, पुसद, मारेगाव आणि राळेगाव या तालुक्यांना सोसावा लागला. एकट्या बाभूळगाव तालुक्यातील सहा हजार ९८ हेक्टर क्षेत्राचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर नेर तालुक्यातील १४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : उत्तर भारतातील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे मंगळवारी जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले. गारपिटीसह झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल आठ हजार १४९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अवकाळीची सात तालुक्यांना झळ बसली असून सर्वाधिक नुकसान बाभूळगाव तालुक्याचे झाले आहे.
यवतमाळ शहरासह सात तालुक्यात मंगळवारी सायंकाळी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा फटका बाभूळगाव, नेर, कळंब, दिग्रस, पुसद, मारेगाव आणि राळेगाव या तालुक्यांना सोसावा लागला. एकट्या बाभूळगाव तालुक्यातील सहा हजार ९८ हेक्टर क्षेत्राचे या पावसामुळे नुकसान झाले आहे. तर नेर तालुक्यातील १४७ हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. कळंब तालुक्यातील ७००, तर दिग्रस तालुक्यातील ६४७ हेक्टर क्षेत्राला या पावसामुळे झळ बसली आहे. पुसद तालुक्यातील १५९, मारेगाव तालुक्यातील पाच हेक्टर, तर राळेगाव तालुक्यातील ३९४ हेक्टर क्षेत्राचेही पावसाने नुकसान केले. या पावसाचा गहू, हरभरा, भाजीपाला, कापूस, तुरीसह फळ पिकांना मोठा फटका सोसावा लागला. अवकाळीमुळे कळंब तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रावरील कापसाचे नुकसान झाले तर पुसद तालुक्यातील २१ आणि राळेगाव तालुक्यातील २१७ हेक्टर क्षेत्रही बाधित झाले. दिग्रस तालुक्यातील १७७ हेक्टर क्षेत्रावरील, तर बाभूळगाव तालुक्यातील १२ हेक्टर क्षेत्रावरील फळ पिकांनाही अवकाळी पावसाची झळ बसली आहे.
दरम्यान, सरत्या वर्षात शेतकऱ्यांना सुरुवातीला अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यानंतरही नुकसानीचे शुक्लकाष्ठ सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे पुन्हा एकदा मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. तर लोकप्रतिनिधींनीही तातडीने नुकसान पाहणी दाैऱ्यास सुरुवात केली आहे. आमदार अशोक उईके यांनी बुधवारी तातडीने बाभूळगाव तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गारपिटीने तुरीच्या शेंगा फोडल्या
दाभा (पहूर) : बाभूळगाव तालुक्याच्या दाभा (पहूर) परिसराला मंगळवारी गारपीट झाली. बोरापेक्षाही मोठ्या आकाराच्या गारा पडल्याने झाडाला असलेल्या तुरीच्या वाळलेल्या शेंगा फुटल्या. तुरीचा सडा शेतात पडून होता. या प्रकारात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. हरभऱ्यासह भाजीपाला पिकालाही तडाखा बसला. शेतातून घरी परतणाऱ्या मजुरांचे हाल झाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकल्याने तारा तुटल्या. त्यामुळे अनेक गावे अंधारात होती.
जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान तुरीचे
- जिल्ह्यात एक लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी तुरीचे उत्पादन घेतलेले आहे. सध्या हे पीक काढणीच्या स्थितीत आहे. तर साधारण ८० हजार हेक्टर क्षेत्रावर हरभरा आहे. या दोन प्रमुख पिकांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा सोसावा लागला आहे.
- बाभूळगाव तालुक्यातील तब्बल तीन हजार ५१९ हेक्टर क्षेत्रावरील तुरीचे नुकसान झाले आहे. नेर ४७, दिग्रस ४४०, कळंब २७५, पुसद आठ, मारेगाव चार, तर राळेगाव तालुक्यातील १७७ हेक्टर क्षेत्रावरील तुरीला पावसाचा फटका बसला.
गहू आडवा, हरभऱ्याचे घाटे गळाले
- जिल्ह्यात ६४१ हेक्टर क्षेत्रावरील गव्हाचे उभे पीक आडवे झाले आहे. तर, २४३४ हेक्टर क्षेत्रावरील हरभऱ्याचे नुकसान झाले असून, घाटे गळाल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. गव्हाचे सर्वाधिक ४३५ हेक्टरवरील नुकसान बाभूळगाव तालुक्यात झाले आहे.
- कळंब १०० आणि पुसद तालुक्यातील १०५ हेक्टरवरील गव्हालाही या अवकाळीचा फटका बसला. बाभूळगाव तालुक्यातील २११२ हेक्टर हरभऱ्याला पावसाचा दणका बसला असून नेर १००, कळंब २००, तर पुसद तालुक्यातील २५ हेक्टर हरभऱ्याचे पीक बाधित झाल्याचा अंदाज आहे.