जिल्ह्यातील रेतीघाट असुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 10:18 PM2018-10-30T22:18:51+5:302018-10-30T22:19:17+5:30
जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत सप्टेंबरमध्ये संपली. त्यानंतर नव्याने रेतीघाटांचा लिलाव झाला. त्यालाही न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रेतीघाटांची सुरक्षा करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील रेतीघाटांची मुदत सप्टेंबरमध्ये संपली. त्यानंतर नव्याने रेतीघाटांचा लिलाव झाला. त्यालाही न्यायालयातून स्थगिती मिळाली आहे. न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत रेतीघाटांची सुरक्षा करण्याची जबाबदारी महसूल यंत्रणेवर आहे. याच संधीचा फायदा घेत रेतीमाफिया रेतीचा चोरून उपसा करीत आहे. ही रेती शहरात तिप्पट दराने विकली जात आहे.
यावर्षी बरसलेल्या धुवाधार पावसामुळे रेतीघाट खचाखच भरले आहे. यामुळे गतवर्षीच्या तुलनेत रेतीघाटामध्ये मुबलक रेती आहे. यातून जिल्हा प्रशासनाला मोठा महसूल मिळणार आहे. तरी ही लिलाव प्रक्रिया न्यायालयाच्या आदेशामुळे स्थगित करण्यात आली. तोपर्यंत या रेतीघाटांची सुरक्षा करण्याचे काम महसूल यंत्रणेवर आहे. महसूल यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांकडे कामाचा प्रचंड व्याप आहे. यामुळे रेतीघाटांवर पाळत ठेवण्याच्या कामात दिरंगाई होत आहे. यातून रेती मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. चोरीच्या मार्गाने उपसा करण्यात आलेली रेती शहर आणि ग्रामीण भागात रात्री पोहोचते. त्याकरिता विशेष दर आकारले जात आहेत. हे दर पूर्वीच्या तुलनेत तिप्पट आहे.
अंधाराचा फायदा
दिवसा रेतीची वाहतूक केली तर ती सर्वांच्या नजरेत येते. यामुळे रात्री रेतीचे ट्रक भरले जातात. छुप्या मार्गाने संबंधितांच्या घरापर्यंत पोहोचविले जातात अथवा शेतामध्ये साठा केला जात आहे. गावापासून दूर ठिकाणावर या रेतीचे छुपे ढिगारे आहेत.
असे आहेत रेतीचे दर
३० सप्टेंबरपर्यंत ६ हजार रूपये ट्रक
१५ आॅक्टोबरपर्यंत १२ हजार रूपये ट्रक
सध्या १५ हजार रूपये ट्रक