सुदाम मंचलवारची यूपीएससीत भरारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 10:18 PM2018-04-30T22:18:19+5:302018-04-30T22:19:15+5:30
येथील सुदाम हरिविजय मंचलवार या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) स्पर्धा परीक्षेत भरघोस यश संपादन केले असून त्याला संपूर्ण देशातून ८३८ वी रँक मिळाली आहे. सुदाम हा येथील उत्तरवार ले-आऊटमधील रहिवासी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : येथील सुदाम हरिविजय मंचलवार या विद्यार्थ्याने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) स्पर्धा परीक्षेत भरघोस यश संपादन केले असून त्याला संपूर्ण देशातून ८३८ वी रँक मिळाली आहे. सुदाम हा येथील उत्तरवार ले-आऊटमधील रहिवासी आहे.
सुदामने पाचवी ते १२ वीपर्यंंतचे शिक्षण येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) विद्यालयात केले, तर पहिली ते चौथीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्याने येथील महिला समाज विद्यालयात पूर्ण केले. सुरूवातीपासूनच अभ्यासात हुशार असलेल्या सुदामला क्रिकेट खेळाचे खूप वेड आहे.
सेवा सहकारी संस्थेत शाखा सचिव म्हणून कार्यरत असणारे त्याचे वडील हरिविजय तसेच त्याची आई आशा यांनी त्याला सुरूवातीपासूनच परिस्थितीची जाणिव करून दिली. दहावी व बारावीच्या परीक्षेतही त्याने भरघोस यश मिळविले होते.
त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनिअरींगचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण करून पदवी प्राप्त केली. पंरतु कोणत्याही परिस्थितीत आपल्याला भारतीय प्रशासन सेवेत जायचेच, अशी जिद्द त्याने उराशी बाळगली होती. त्यादृष्टीने त्याने युपीएससी परीक्षेची तयारी केली. त्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले. त्याचे आईवडील व बहिण राधा यांनी त्याला प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे यापूर्वीही त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. तो सध्या सीआरपीएफमध्ये असीस्टंट कमांडर या पदावर कार्यरत असून गुडगाव येथे त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. तो आपल्या यशाचे श्रेय वडील हरिविजय, आई आशा व बहिण राधा व गुरूजनांना देतो.