गाळेधारकांना नगरविकासची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 09:33 PM2019-02-26T21:33:15+5:302019-02-26T21:33:53+5:30
येथील गांधी चौकात पालिकेने बांधलेल्या गाळ्यांच्या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाने १६० व्यापाऱ्यांना नोटीस बजावली असून येत्या २८ फेब्रुवारीला गुरूवारी नगरविकास मंत्रालयात येऊन आपली बाजू मांडण्याच्या सूचना नोटीसद्वारे दिल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील गांधी चौकात पालिकेने बांधलेल्या गाळ्यांच्या प्रकरणात नगरविकास मंत्रालयाने १६० व्यापाऱ्यांना नोटीस बजावली असून येत्या २८ फेब्रुवारीला गुरूवारी नगरविकास मंत्रालयात येऊन आपली बाजू मांडण्याच्या सूचना नोटीसद्वारे दिल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
सदर गाळ्यांच्या लिलावासंदर्भात नगरसेवक पी.के.टोंगे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची चौकशी करून त्याचा अहवाल आठ आठवड्यांमध्ये सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने नगरविकास मंत्र्यांना दिले होते. त्यानुसार नगरविकास मंत्रालयाने वणीतील १६० गाळेधारक व्यापाऱ्यांसह पी.के.टोंगे तसेच पालिकेच्या मुख्याधिकाºयांना नोटीस बजावली आहे. ब्रिटीश सरकारने वणी नगरपालिकेचे उत्पन्न वाढावे, यासाठी २५ हजार चौरस फूट जागा दिली होती. या खुल्या जागेवर पालिकेने गाळे उभे करून ते भाडे तत्वावर दिले होते. मात्र या विषयात पी.के.टोंगे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
नगरविकास मंत्रालयाने न्यायालयाच्या आदेशावरून या प्रकरणात नव्याने सुनावणी सुरू केली आहे. न्यायालयाने आखून दिलेल्या कालावधीतच नगरविकास मंत्रालयाला सुनावणीची कारवाई पूर्ण करावयाची आहे. २८ फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीदरम्यान स्वत: व्यापारी किंवा त्याच्या प्रतिनिधीला उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. उपस्थित न राहिल्यास एकतर्फी निर्णय दिला जाईल, असे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे. वणी नगरपालिकेने नगरविकास मंत्रालयाचा हा आदेश सर्व संबंधित व्यापाºयांपर्यंत पोहोचविला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हे व्यापारी संकुल वादग्रस्त ठरले आहे. काही व्यापाऱ्यांनी नगरपालिकेला अंधारात ठेऊन आपसी विक्रीपत्र करून घेतले आहे. अनेक गाळेधारक सध्या हयातदेखिल नाहीत. अनेक व्यापाºयांनी स्वत:च्या अधिकारात गाळ्यांवर आणखी बांधकाम केले. यासाठी परवानगी घेतली का, हा चौकशीचा भाग आहे. नगरविकास मंत्रालयाच्या नोटीसमुळे व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या विषयात आता निर्णय कुणाच्या बाजूने लागतो, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. सदर गाळे हे ब्रिटीशकालीन आहेत.