डोंगरगावची उर्दू शाळा मोडकळीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:26 PM2018-01-10T22:26:07+5:302018-01-10T22:26:49+5:30
महागाव तालुक्यातील पुनर्वसित डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेची उर्दू प्राथमिक शाळा मोडकळीस आली आहे. इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागते. या भीतीमुळे आता उघड्यावर वर्ग भरविले जात आहे.
सय्यद मुद्दसीर।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरगाव : महागाव तालुक्यातील पुनर्वसित डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेची उर्दू प्राथमिक शाळा मोडकळीस आली आहे. इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागते. या भीतीमुळे आता उघड्यावर वर्ग भरविले जात आहे.
महागाव तालुक्यातील डोंगरगाव पूस प्रकल्पामुळे बुडित क्षेत्रात गेले. या गावाचे १९८२ साली पुनर्वसन करण्यात आले. त्यावेळी मुस्लीम समाजाच्या मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा परिषदेने उर्दू शाळा सुरु केली. त्यावेळी सुसज्ज इमारत बांधण्यात आली. याठिकाणी पहिली ते आठवीपर्यंत वर्ग आहेत. दीडशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेतात.
आता ३७ वर्षापूर्वी बांधलेली शाळा इमारत मोडकळीस आली आहे. शाळेच्या भिंतीला तडे गेले असून स्लॅब दुभंगला आहे. अशा परिस्थितीतही तेथे वर्ग भरविले जातात. यामुळे मुलांच्या सुरक्षिततेची चिंता पालकांना आहे. यामुळे काही दिवसांपासून उघड्यावर वर्ग भरविले जातात. शाळेच्या या इमारतीची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे. वारंवार पाठपुरावा करण्यात आला. परंतु उपयोग झाला नाही. आता येथील पालक जिल्हाधिकाºयांना भेटणार आहेत. संबंधित पंचायत समिती प्रशासनाने पाठबपुरावा करून शाळेसाठी नवीन इमारत बांधून द्यावी अशी मागणी आहे.