दारूच्या तस्करीसाठी अ‍ॅम्बुलन्सचा वापर

By admin | Published: September 17, 2015 03:13 AM2015-09-17T03:13:06+5:302015-09-17T03:13:06+5:30

शहरात बनावट दारूची निर्मिती केली जात असून ही दारू वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी चक्क एका ...

Use Ambulance for smuggling alcohol | दारूच्या तस्करीसाठी अ‍ॅम्बुलन्सचा वापर

दारूच्या तस्करीसाठी अ‍ॅम्बुलन्सचा वापर

Next

बनावट दारू : विक्री आज, नोंद घेतात उद्या
यवतमाळ : शहरात बनावट दारूची निर्मिती केली जात असून ही दारू वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पोहोचविण्यासाठी चक्क एका राजकीय नेत्याच्या नावे असलेल्या दोन अ‍ॅम्बुलन्सचा सर्रास वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.
‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात ‘एक्साईजच्या वसुलीचे दरपत्रक’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून हप्त्याच्या रकमेचा संपूर्ण हिशेबच उघड केला. त्या पार्श्वभूमीवर दारू विक्रीतील अनेक गोंधळ उघड झाले आहे. त्यानुसार, यवतमाळातच बनावट दारूची निर्मिती करणारे शहर व परिसरात तीन ते चार कारखाने आहेत. या कारखान्यातील दारू जिल्ह्यातील अनेक बीअरबारमधून विकली जाते. हीच दारू वर्धा व चंद्रपूर या बंदी असलेल्या जिल्ह्यांमध्ये पोहोचविली जाते. ट्रक, मेटॅडोअर व अन्य वाहनांद्वारे होणारी दारूची ही वाहतूक पकडली जाण्याची भीती असते. म्हणून या दारूच्या तस्करीसाठी चक्क अ‍ॅम्बुलन्स वापरण्याचा फंडा या बनावट दारू निर्मितीचे कारखाने चालविणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांनी वापरला आहे. खाली दारू आणि वर कुणी तरी कार्यकर्ता रुग्ण म्हणून झोपलेला असे चित्र या अ‍ॅम्बुलन्समध्ये असते. सायरन वाजवित सर्रास या अ‍ॅम्बुलन्स वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात दूरपर्यंत जातात. त्यात रुग्ण असावा असे समजून पोलिसांकडून त्याची कधीच तपासणी होत नाही. त्याचाच फायदा उठवित दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. या दोन अ‍ॅम्बुलन्स असून त्यातील एक मोठी व एक लहान आहे. राजकीय नेत्याच्या नावाने या अ‍ॅम्बुलन्स चालविल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात त्या आजतागायत रुग्ण कल्याणासाठी धावलेल्या नाहीत. त्याचा बहुतांश वापर हा दारूच्या निमित्तानेच झाला आहे. अ‍ॅम्बुलन्समधून होणारी ही दारूची तस्करी शोधण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिसांपुढे आहे.
हीच बनावट दारू जिल्ह्यातील अनेक बीअरबारमधून विकली जाते. नियमानुसार दारू विक्री होताच ग्राहकाला त्याचे बिल मिळणे क्रमप्राप्त आहे. अर्थात या दारूची बारमधील रजिस्टरवर लगेच नोंद अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात हे रजिस्टर दुसऱ्या दिवशी भरले जाते. यवतमाळात ही रजिस्टर लिहिणारे तीन ते चार खास तरुण आहेत. सकाळपासून ते शहरातील आपल्या नियोजित बीअरबारमध्ये जाऊन आपल्या सोईने रजिस्टर ‘अपडेट’ करतात. त्यात बहुतांश क्रमांक एकची दारू व क्रमांक दोनची दारू अशी विभागणी असते. त्याचे रजिस्टरच वेगळे आहे. क्रमांक दोनच्या दारूचे रजिस्टर तपासण्याची तसदी कधी एक्साईजकडून घेतली जात नाही. सर्व काही ‘मिलीभगत’ असल्याने हे रजिस्टर तपासण्याचा प्रश्नच एक्साईजपुढे निर्माण होत नाही. हे रजिस्टर तपासू नये, रोजच्या रोज नोंद का घेतली नाही, ग्राहकाला बिल का देत नाही, हे विचारू नये म्हणूनच एक्साईजला नियमित पाकिट पोहोचविले जाते. ५ तारखेपर्यंत पाकीट न पोहोचले तरच एक्साईजची चमू बारमध्ये तपासणीच्या निमित्ताने सॅल्यूट ठोकण्यासाठी हजर होते, हे विशेष. वणीपासून उमरखेडपर्यंत हाच प्रकार सर्रास व राजरोसपणे सुरू आहे. त्याच्या लाभाचे अनेक वाटेकरी आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Use Ambulance for smuggling alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.