बर्फ गोळ्यात केला जातो घातक रसायनांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 09:02 PM2019-04-27T21:02:03+5:302019-04-27T21:02:44+5:30
उन्हाचा पारा वाढत असताना गारवा मिळविण्याच्या नादात जर तुम्ही बर्फ गोळा खात असाल तर सावधान...! या बर्फ गोळ्याला चव आणण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात येत आहे. यातून दुर्धर आजाराची बाधा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : उन्हाचा पारा वाढत असताना गारवा मिळविण्याच्या नादात जर तुम्ही बर्फ गोळा खात असाल तर सावधान...! या बर्फ गोळ्याला चव आणण्यासाठी घातक रसायनांचा वापर करण्यात येत आहे. यातून दुर्धर आजाराची बाधा होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
उन्हाळ्यात थंड पेयांची मागणी आपसुकच वाढते. त्यात बर्फ गोळा हा महत्वाचा घटक आहे. मात्र हा बर्फ कसा बनविला जातो, बर्फ तयार करण्यासाठी कोणते पाणी वापरले जाते, ज्याठिकाणी बर्फ बनविला जातो, तेथे स्वच्छता पाळली जाते की नाही, याचा साधा विचारही बर्फगोळा खाणारा करत नाही. बर्फ तयार करण्याचे बहुतांश ठिकाणे अस्वच्छतेच्या विळख्यात असतात. त्यातच बर्फ तयार करण्यासाठी वापरले जाणारे पाणी हे शुद्ध असतेच असे नाही. त्यातच बर्फ गोळा विकणारे त्या गोळाला अधिक आकर्षित व चवदार बनविण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर करीत आहे.
बर्फगोळ्याला गोडवा देण्यासाठी सॅक्रीनचा अधिक वापर केला जातो. हे सॅक्रीन शरिरासाठी अतिशय घातक असते. कलरयुक्त सॅक्रीनचा पाक तयार करतानाही दूषित पाण्याचा वापर केला जातो. त्यातून पोटाचे विकार बळावतात. प्रसंगी काविळ, टायफाईड, डायरिया यासारखे आजार लहान मुलांमध्ये बळावण्याची दाट शक्यता आहे.