दारव्हा तालुक्यात शासकीय कामांवर नियमबाह्य वाहनांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:43 AM2021-07-27T04:43:59+5:302021-07-27T04:43:59+5:30
फोटो मुकेश इंगोले दारव्हा : तालुक्यातील शासकीय कामांवर चक्क नियमबाह्य आणि कालबाह्य वाहनांचा वापर होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ...
फोटो
मुकेश इंगोले
दारव्हा : तालुक्यातील शासकीय कामांवर चक्क नियमबाह्य आणि कालबाह्य वाहनांचा वापर होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खुलेआमपणे हा प्रकार सुरू आहे. अशा वाहनांची तपासणी करून कारवाईची मागणी केली जात आहे.
बांधकामावर वापरले जाणारे ट्रक, पाण्याचे टँकर, मोठमोठ्या मशीन, त्याचसोबत इतर अनेक वाहनांचे इन्शुरन्स, फिटनेस सर्टीफिकेट नाही. त्याअभावी पासिंग होत नसल्याने तशीच वाहने रस्त्यावर धावतात. त्यामुळे रस्ते वाहतूक नियमांची पायमल्ली होत आहे. तालुक्यात सध्या राष्ट्रीय, राज्य मार्गासह अनेक रस्ते, पूल, तसेच इतर मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची बांधकामे सुरू आहेत. या कामासाठी लागणारे मुरूम, गिट्टी, डांबर यासह इतर साहित्याच्या वाहतुकीला लागणारे ट्रक, टिप्पर, जेसीबी, पोकलँड मशीन, पिकअप वाहने, मिक्सर मशीन, रोडरोलर, काँक्रिटीकरणावर पाणी मारण्यासाठी टँकर यासह अनेक वाहनांची रेलचेल शहरातील चोहोबाजूंनी सुरू आहे. यातील अनेक वाहने भंगार, कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे.
अनेक वाहनांना नंबर प्लेट नाही. सुरक्षाविषयक चिन्ह लावले जात नाही. काही वाहनांवर आरएसटी, आरएसकेटी असे क्रमांक दिसतात. इन्शुरन्स, फिटनेस सर्टिफिकेट नाही. त्यामुळे पासिंगच केले जात नसल्याने पाच-पाच वर्षांपासून टँक्स ड्यू असणारी वाहने रस्त्यावर धावतात. कित्येक किलोमीटर अंतरावर बांधकाम साहित्याची वाहतूक, तसेच प्रत्यक्ष बांधकामासाठी या वाहनांचा वापर होत आहे. त्यामुळे रस्ते वाहतूकविषयक नियमांचे पालन होणे आवश्यक आहे; परंतु कंत्राटदारांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. या वाहनांमुळे प्रदूषणातही वाढ होत असल्याच्या तक्रारी आहेत. भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने अपघाताची भीती आहे. त्यामुळे बांधकामावरील वाहनांची सुरक्षाविषयक, तसेच कागदपत्रांची तपासणी होण्याची आवश्यकता आहे.
बाॅक्स
शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलाला चुना
वाहतुकीसाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांशिवाय रस्त्याच्या बांधकामासाठी वाहनांचा वापर होत आहे. त्यातच विविध प्रकारचे टॅक्स भरले जात नसावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असताना कोणतीही कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
260721\img-20210625-wa0021.jpg
दारव्हा तालुक्यात बांधकामावर अशा भंगार वाहनांचा वापर होत आहे.