स्वाध्यायपुस्तिका वापराविना रद्दीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 09:55 PM2019-07-14T21:55:15+5:302019-07-14T21:56:27+5:30
समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या स्वाध्याय पुस्तिका आणि पुस्तके वापराशिवाय रद्दीत जात आहे. मागील २७ मार्च रोजी यवतमाळ शहरात वर्ग ८ च्या इतिहास-नागरिकशास्त्र विषयाच्या हजारो सिलबंद स्वाध्याय पुस्तिका प्लेट निर्मिती कारखान्याकडे नेणारे वाहन आढळल्याने या अभियानाला गालबोट लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : समग्र शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या स्वाध्याय पुस्तिका आणि पुस्तके वापराशिवाय रद्दीत जात आहे. मागील २७ मार्च रोजी यवतमाळ शहरात वर्ग ८ च्या इतिहास-नागरिकशास्त्र विषयाच्या हजारो सिलबंद स्वाध्याय पुस्तिका प्लेट निर्मिती कारखान्याकडे नेणारे वाहन आढळल्याने या अभियानाला गालबोट लागले आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यात स्वयंअध्ययनावर भर दिल्याने २०१० पासून पाठ्यपुस्तक मंडळाने सर्वविषयाच्या पुस्तिका विद्यार्थ्यांना देण्याची भूमिका घेतली. मात्र अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच हा गोरखधंदा सुरू असल्याचे सेंटर फॉर अवेअरनेसचे संचालक प्रा.डॉ.प्रदीप राऊत यांनी म्हटले आहे. शिवाय शालेय शिक्षणमंत्री आशीष शेलार यांच्याकडेही तक्रार केली आहे.
यवतमाळ येथील एका प्रसिद्ध भंगार व्यावसायिकाकडून वाहतूक करताना सात ते आठ क्विंटल स्वाध्याय पुस्तिकांचा अवैध साठा येथील अशोक नगरातील एका लघु उद्योजकाकडे नेताना आढळला. जिल्ह्यात वितरीत झालेल्या सर्व विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांच्या वितरणाची चौकशी करावी, अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली आहे.
स्वाध्याय पुस्तिकांचे मुद्रण करताना मंडळाने ७० जीएसएम क्रिमवोव्ह कागद वापरला. असा कागद कागदी प्लेटांसाठी उपयोगात आणला जातो. २०१६ मध्ये एक लाख ६० हजार तर २०१०-१५ मध्ये १० लाखापेक्षा अधिक पाच कोटींच्या पुस्तकांची छपाई कोल्हापूर येथून करून घेतली. मात्र विद्यार्थ्यांना या पुस्तिका पुरविल्या नाही. या पुस्तिका रद्दीत विकल्या गेल्याने सर्वशिक्षा अभियानाचा बोजवारा उडाला. ज्या पाल्यांना २०१० पासून पुस्तिका प्राप्त झाल्या नाही. त्यांच्या पालकांनी सेंटर फॉर अवेअरनेस व यंत्रणांकडे तक्रार नोंदविण्यास पुढे यावे, असे आवाहन डॉ. राऊत यांनी केले आहे.
जाणीवपूर्वक वितरण थांबविले, पुस्तिकेपासून पालक अनभिज्ञ
सर्वशिक्षा अभियानांतर्गत स्वाध्याय पुस्तिका मोफत मिळतात याची माहिती अनेकांना नाही. याचाच फायदा घेत स्वाध्याय पुस्तिकांचे वाटप जाणीवपूर्वक रखडून ठेवले जाते. साठवणूक स्थळी पुस्तिकांची गर्दी वाढल्याचे निमित्त करून रद्दीत विल्हेवाट लावण्यात येते. यामध्ये गैरप्रकार होते. दरम्यान, स्वाध्याय पुस्तिका विल्हेवाट प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तक्रारीतील नावे व स्थळ पाहून सीसीटीव्ही फुटेजची तत्काळ नोंद घेतली नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांच्या दोन पत्रानुसार कायदेशीर तक्रार दाखल केली नाही. शिक्षणमंत्री आशीष शेलार यांनी पोलीस महासंचालक व आयुक्तांमार्फत कारवाई करावी, अशी मागणी डॉ. राऊत यांनी केली.