धक्कादायक! शिवभोजन थाळीच्या स्वच्छतेची ऐशीतैशी; शौचालयात धुतली जाताहेत जेवणाची भांडी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 01:33 PM2022-03-29T13:33:30+5:302022-03-29T13:33:47+5:30
शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार उघडकीस; व्हिडीओ व्हायरल
यवतमाळ: ग्रामीण भागातील गरीब नागरिक शहरात आल्यानंतर त्यांना उपाशी राहू नये यासाठी राज्य सरकारने शिवथाळी भोजन सुरू केले. यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव येथील शिवथाळी केंद्रातील भयाण वास्तव समोर आले आहे. या केंद्रात ग्राहकांना दिली जाणारी थाळी शौचालयातील पाण्याने धुतली जाते. संबंधित शिवभोजन केंद्रावरील व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
शिवभोजन केंद्रातील किळसवाणा प्रकार दाखवणारा व्हिडीओ समोर आल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे शिवभोजन थाळी केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्तीचे असल्याची माहिती मिळाली आहे. गरिबांना कमी दरात चांगले जेवण मिळावे या हेतूने ठाकरे सरकारनं शिवभोजन थाळी सुरू केली. मात्र यवतमाळमधील प्रकार पाहता सरकारच्या हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. अशाप्रकारे गलिच्छ जागेवर भांडी धुऊन त्याच थाळीत पुन्हा भोजन दिले जात असल्याने सरकार एक प्रकारे गरिबांची थट्टाच करत असल्याचे दिसून येत आहे. आता या शिवभोजन केंद्र चालकावर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.