पांढरकवडा कृषी कार्यालयाला रिक्त पदांचा आजार, अनेक योजना प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:32+5:302021-08-19T04:45:32+5:30

शेतकरी हितासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय महत्त्वाचे मानले जाते. मात्र, अनेक पदे रिक्त असल्याने तालुका कृषी कार्यालयातील विविध सेवा, ...

Vacancies at Pandharkavada Agriculture Office affected many schemes | पांढरकवडा कृषी कार्यालयाला रिक्त पदांचा आजार, अनेक योजना प्रभावित

पांढरकवडा कृषी कार्यालयाला रिक्त पदांचा आजार, अनेक योजना प्रभावित

googlenewsNext

शेतकरी हितासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय महत्त्वाचे मानले जाते. मात्र, अनेक पदे रिक्त असल्याने तालुका कृषी कार्यालयातील विविध सेवा, योजना कागदावरच राहण्याचा धोका निर्माण झाला आहे. या कार्यालयाचे रिक्त पदांचे ग्रहण अजून सुटलेले नाही. कार्यालयाअंतर्गत ५० विविध पदे मंजूर असूनही तब्बल १५ पदे रिक्त आहेत. शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती, कमी खर्चात अधिक उत्पादन कसे घ्यावे याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून मिळते. हे कार्यालय राज्य शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत येते. या कार्यालयाचा कारभार व्यवस्थित चालावा यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, पांढरकवडा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सध्या तरी अपवाद ठरले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ही पदे रिक्त असूनही जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष आहे. अनेक शेतकरी आता पारंपरिक पिके टाळून आधुनिकतेकडे वळले आहेत. अशा शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांकडून तातडीने मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. मात्र, रिक्त पदांमुळे प्रशासकीय गतिमानता रखडल्याचे दिसून येत आहे. येथे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे एक पद, कृषी अधिकारी एक पद, कृषी पर्यवेक्षक दोन पदे, कृषी सहायक दोन पदे, लिपिक दोन, अनुरेखक चार, वाहनचालक तीन अशी एकूण १५ पदे रिक्त आहेत. तालुका कृषी अधिकारी पदही गेल्या काही वर्षांपासून सध्या प्रभारी आहे. या कार्यालयाअंतर्गत पांढरकवडा मंडळ अधिकारी अंतर्गत ४, पाटणबोरी मंडळाअंतर्गत ४ पदे रिक्त आहेत. तर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तब्बल ७ पदे रिक्त आहेत. परिणामी अनेक योजना प्रभावित होत असून अनेकदा काही कर्मचारी अधिकारी उपस्थित राहत नसल्याची ओरड आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाययोजना कराव्या, अशी अपेक्षा आहे.

कोट : पेसाअंतर्गत हे कार्यालय येत असल्याने येथील जागा रिक्त आहेत. शासनाने भरती घेतल्यास येथील रिक्त पदे भरली जातील, अशी अपेक्षा आहे.

-आर. आर. दासरवार, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, पांढरकवडा.

Web Title: Vacancies at Pandharkavada Agriculture Office affected many schemes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.