वैभवी दुर्गोत्सव

By Admin | Published: October 17, 2015 12:38 AM2015-10-17T00:38:26+5:302015-10-17T00:38:26+5:30

यवतमाळ शहरातील सर्वात जुने दुर्गोत्सव मंडळ म्हणून हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळ ओळखले जाते.

Vaibhavi Durgotsav | वैभवी दुर्गोत्सव

वैभवी दुर्गोत्सव

googlenewsNext

यवतमाळ शहरातील सर्वात जुने दुर्गोत्सव मंडळ म्हणून हिंदुस्थानी दुर्गोत्सव मंडळ ओळखले जाते. या ठिकाणी यवतमाळ शहरासह लगतच्या गावामधून महिला जल अर्पण करण्यासाठी येतात. मध्यरात्रीपासूनच या ठिकाणी महिला भाविकांची गर्दी होते. या मंडळाचे यंदा ७७ वे वर्ष आहे. मंडळाची नयनरम्य रोषणाई सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. कमी विजेत अधिक प्रकाश देणारी ही रोषणाई आहे. या ठिकाणी दर्शनाकरिता येणाऱ्या भक्तांसाठी संरक्षण पुरविण्याची जबाबदारी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वत: घेतली आहे. रावण दहनाची विशेष पंरपरा याच मंडळाने सुरू केली आहे. त्याकरिता विशालकाय रावण बनविण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. सर्वाधिक गर्दी असणारे हे ठिकाण नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखले जाते. मंडळाचे अध्यक्ष संजय त्रिवेदी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी कार्यकर्ते काम करीत आहे.
बालाजी चौक स्थित बालाजी मंडळ दुर्गादेवी उत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या मंडळाने त्रिलोकपुरी देखावा साकारला आहे. यामध्ये विशालकाय हिमालय पर्वताची निर्मिती करण्यात आली आहे. यासोबतच भगवान शंकराच्या जटेतून अवतरलेली गंगा या ठिकाणी पाहायला मिळते. शिवमहिमा, कृष्णलीला आणि रामलीलेचे देखावे मंडळाने साकारले आहे. रोषणाईवर विशेष भर देण्यात आला आहे. या ठिकाणी मोठी गर्दी उसळली आहे. या मंडळाने ‘मुलगी वाचवा’ या विषयाकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी यासंबंधीच्या घोषवाक्यांचे फलक लावले आहे. हे फलक जाणीवजागृतीेचे काम करीत आहे. नगराध्यक्ष तथा मंडळाचे संस्थापक सुभाष राय यांच्या नेतृत्वात मंडळाचे कार्यकर्ते काम करीत आहे.
वडगाव स्थित सुभाष क्रीडा मंडळाचे ४९ वे वर्ष आहे. या मंडळाने संजीवनी पहाड साकारला आहे. वानरसेना, युद्धात लक्ष्मणाला लागलेला बाण, आणि बेशुध्द अवस्थेत असलेला लक्ष्मण असा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे. यासोबतच बाहुबली देखाव्यातील धबधबा साकारण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांसोबतच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी उभा केला जात आहे. याची दानपेटीच या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. विशाल भुयार आणि वृक्षसंवर्धनावर मंडळाने भर दिला आहे. मंदिरात प्रवेश करताच जलाशयात असलेली माँ दुर्गा कमळाचे फुल वेचताना दिसते. गणराय वाघाच्या खांद्यावर बसले आहेत, असा देखावा साकारण्यात आला आहे. या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी विशालकाय राक्षसाचा मुखवटा बनविण्यात आला आहे. या भागात दर्शनाकरिता भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. मंडळाचे अध्यक्ष संजय लंगोटे यांच्या नेतृत्वतात हे मंडळ काम करीत आहे.
आर्णी मार्गावरील राणा प्रताप गेटमधील जगदंबा दुर्गोत्सव मंडळाचे यंदा १३ वे वर्ष आहे. या मंडळाने फायबर प्लेटचा वापर करून अक्षरधामची प्रतिकृती साकारली आहे. दुर्गोत्सव मंडळाच्या प्रांगणात विविध प्राणी बसविण्यात आले आहे. यासोबतच शंकराची भव्य मूर्ती आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी झुलेही साकारण्यात आले आहे. अक्षरधाम मंदिरात प्रवेश करताच रायगडावरील शिवरायांच्या सिंहासनाची नक्कीच आठवण येते. शिवरायाच्या सिंहासनाची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे. यामुळे माँ दुर्गेची देखणी मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेते. मंडळाचे अध्यक्ष विवेक देशमुख यांच्या नेतृत्वात या ठिकाणी काम केले जात आहे.
गणेशनगरातील छत्रपती दुर्गोत्सव मंडळाचे १६ वे वर्ष आहे. या मंडळाने अमृतसरच्या सुवर्ण मंदिराच्या धर्तीवर माँ दुर्गेची सुवर्णकुटी साकारली आहे. या कुटीमध्ये आसनस्थ असलेली दुर्गामैय्याची मूर्ती बंगळीवर झुलतानाचे अप्रतिम दृष्य साकारण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष सचिन धरणे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते काम करीत आहेत. आर्णी मार्गावरील वैद्यनगरातील लोकमान्य दुर्गोत्सव मंडळाचे २८ वे वर्ष आहे. या मंडळाने ग्रामीण भागातील महिलांचे जीवन आदिशक्तीच्या रूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. झोपडीमधील अवस्था साकारली आहे. आतील मातीचे घर शेणाने सारवले आहे. घरात असलेली अडगळ, त्यावर असलेले टोपले, खराटा, बाजूला असलेली घडवंची, स्वयंपाकगृहात असलेले पितळीचे भांडे, देवळीत असलेला दिवा, पेटविलेली चूल, त्या ठिकाणी असलेली भाजी आणि पाळण्यात झोपलेले गणराय असे सुंदर दृष्य मंडळाने साकारले आहे. मंडळाचे अध्यक्ष भैया मानकर यांच्या नेतृत्वात या मंडळाचे कार्यकर्ते काम करीत आहेत.
सरस्वतीनगरातील एकविरा दुर्गोत्सव मंडळाचे २३ वे वर्ष आहे. या मंडळाने लोट्स टेम्पल साकारले आहे. या मंडळाने पर्यावरणावर भर देण्यासाठी कापडी पिशव्या मोफत वितरणाचे काम हाती घेतले आहे. मंडळाचे अध्यक्ष मोरेश्वर पांढरकर यांच्या नेतृत्वात काम केले जात आहे.
छोटी गुजरीतील एकता दुर्गोत्सव मंडळाचे ४६ वे वर्ष आहे. या मंडळाने शिशमहाल साकारला आहे. त्याकरिता दीड लाख काचेच्या बाटल्या वापरण्यात आल्या आहेत. ५१ फूट उंच मंदिर साकारण्यात आले आहे. मंडळाचे अध्यक्ष सतीश पातालबंसी यांच्या नेतृत्वात काम केले जात आहे.
गणपती मंदिर चौकातील नवशक्ती दुर्गोत्सव मंडळाचे ४४ वे वर्ष आहे. या मंडळाने अखंड दीप संकल्पना राबविली आहे. कालभैरवनाथ दर्शन आणि हनुमान मूर्ती असा देखावा त्यांनी साकारला आहे. मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम निमोदिया यांच्या नेतृत्वात काम केले जात आहे.
चांदनी चौकातील नवीन दुर्गोत्सव मंडळाने जय मल्हारचा चलचित्र देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी उसळत आहे.
जयहिंद चौकातील जयहिंद दुर्गोत्सव मंडळाने नगाऱ्याची प्रतिकृती साकारली आहे. दत्त चौकातील सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाचा अखंड दीप निरंतर सुरूच असतो. या मंडळाने भक्तांचे लक्ष वेधण्यासाठी चौकामध्ये कारंजे लावले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या वैचारिक प्रबोधनासाठी फ्लेक्स लावले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना वाचविण्याचा संदेश देण्यात आला आहे. त्यांना मदत करण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. स्थानिक आझाद मैदानात गुजराती मंंडळाचा दुर्गोत्सव साजरा होतो.

Web Title: Vaibhavi Durgotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.