वडिलांविना पोरक्या वैष्णवीने सर केला नीट परीक्षेचा अवघड गड, मिळवले 720 पैकी 700 गुण
By रवींद्र चांदेकर | Published: June 14, 2023 08:59 PM2023-06-14T20:59:40+5:302023-06-14T20:59:46+5:30
मामांचे सहकार्य : १२ वर्षांपूर्वी अपघातात गेले वडील
महागाव (यवतमाळ) : तालुक्यातील पोखरी-इजारा येथील मूळ रहिवासी असलेल्या वैष्णवी रोहिदास राठोड या विद्यार्थिनीने नीटचा गड ७२० पैकी तब्बल ७०० गुण मिळवून सर केला. १२ वर्षांपूर्वी वडिलांचे अपघाती निधन झाल्यानंतर तिने मामांच्या घरी राहून यश प्राप्त केले.
वैष्णवीने प्रचंड मेहनत, जिद्द, चिकाटीने कठीण परिस्थितीतून कोणत्याही प्रकारची खासगी शिकवणी न लावता नीटमध्ये ९९.९८ टक्के गुण घेतले. वैष्णवीचे वडील शिक्षक होते. आई गृहिणी आहे. वडील रोहिदास राठोड यांना दोन मुली. २०१० मध्ये एका अपघातात वैष्णवीच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर राठोड परिवार मूळगावी पोखरी येथे परतला. वैष्णवीच्या आईने दोन मुलींसह समोरील जीवन जगण्यास सुरुवात केली.
दोन्ही मुली अभ्यासात हुशार आहेत. यानंतर चंद्रपूर येथे वीज मंडळाच्या सेवेत असलेले वैष्णवीचे मामा शंकर जाधव (ह.मु. नागपूर) यांनी आपल्या दोन्ही भाच्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. वैष्णवीची मोठी बहीणही नीटमध्ये चमकली होती. मात्र, थोड्या गुणांनी तिचा एमबीबीएसचा प्रवेश हुकला. त्यामुळे ती बीएएमएस करीत आहे.
वैष्णवीचे मामा शंकर जाधव तिला तेथील विद्यानिकेतन शाळेत प्रवेश दिला. तेथे तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. तिने जय हिंद कॉलेजमधून बारावी उत्तीर्ण केली. आपल्या मेहनतीच्या बळावर वैष्णवीने बारावीत ९२ टक्के गुण मिळवून नीटमध्ये पहिल्याच प्रयत्नात यशोशिखर गाठले. तिने ओबीसींमध्ये देशातून ४४ वा क्रमांक पटकाविला.
वैष्णवीसह पाच विद्यार्थी उत्तीर्ण
च्ंद्रपूर येथील जय हिंद कॉलेजमधील एकूण सहा विद्यार्थी नीटमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. वैष्णवीच्या सोबत इतर पाच जणांनी ६०० च्यावर गुण घेतले आहेत. प्रचंड परिश्रम, जिद्द, चिकाटी असेल तर यशापासून तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही, हेच वैष्णवीने सिद्ध केले आहे.