शिक्षकांची शासनाविरूद्ध वज्रमूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 10:00 PM2017-11-04T22:00:13+5:302017-11-04T22:00:25+5:30
नवनवे परिपत्रक, जीआर काढून शासन शिक्षकांना वेठीस धरत आहे. एकीकडे अन्यायकारक बदल्या लादत असतानाच दुसरीकडे वेतनश्रेणीसाठी प्रगत शाळेचा निकष लावला जात आहे, ......
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नवनवे परिपत्रक, जीआर काढून शासन शिक्षकांना वेठीस धरत आहे. एकीकडे अन्यायकारक बदल्या लादत असतानाच दुसरीकडे वेतनश्रेणीसाठी प्रगत शाळेचा निकष लावला जात आहे, या सर्व दडपशाहीविरुद्धचा संताप शनिवारी जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी एकत्र येऊन व्यक्त केला. शिक्षक समन्वय समितीच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महामोर्चात ‘शिक्षक एकजुटीचा विजय असो, शासनाचा निषेध असो’ अशा घोषणांनी तिरंगा चौक दणाणून गेला होता.
अशैक्षणिक कामांनी पिचलेले शिक्षक आॅनलाईन माहिती पाठवून-पाठवून जेरीस आले. पण बदल्यांच्या प्रक्रियेत जेव्हा ५ टक्के शिक्षकांसाठी ८५ टक्के शिक्षकांवर अन्याय होण्याची चिन्हे दिसली, तेव्हा संतापाचा कडेलोट झाला आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळांतील शिक्षकांनी एकत्र येत उठाव केला. यवतमाळ जिल्हा शिक्षक संघटनांची समन्वय कृती समितीच्या वतीने महामोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद आवारातून मोर्चाला प्रारंभ झाला. बसस्थानक चौक, तहसील चौक, जिल्हा बँक अशा मार्गाने मोर्चा तिरंगा चौकात पोहोचल्यानंतर जाहीर सभा झाली.
यावेळी राजूदास जाधव, मधुकर काठोळे, रवींद्र कोल्हे, ज्ञानेश्वर नाकाडे, सतपाल सोवळे, नदीम पटेल, रमाकांत मोहरकर, गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले. शिक्षकांवर बंधने लादून मराठी शाळा बंद पाडण्याचा डाव आहे, अशी टीका यावेळी करण्यात आली. पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणा देत तरुण शिक्षकांनी आवाज बुलंद केला. २३ आॅक्टोबरचा वरिष्ठ व निवडश्रेणीचा जीआर रद्द करा, २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, शिक्षकांवर आॅनलाईन कामांची सक्ती करू नये, बदल्यांच्या धोरणात आवश्यक त्या सुधारणा करूनच मे २०१८ मध्ये बदल्या करा, संगणक प्रशिक्षणासाठी मुदतवाढ द्या आदी मागण्यांसाठी यावेळी नारेबाजी करण्यात आली. न्याय न मिळाल्यास बेमुदत आंदोलन करू तसेच विधिमंडळ अधिवेशनावरही मोर्चा काढू, असा इशारा देण्यात आला. सभेचे संचालन गजानन देऊळकर यांनी केले. गजानन पोयाम यांनी आभार मानले.
शिक्षकांच्या महामोर्चाने यवतमाळ शहरातील वाहतुकीत अर्धा तास खोडा घातला. बसस्थानक चौकात मोर्चा पोहोचल्यावर चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तिरंगा चौकात सभा सुरू असताना सर्व शिक्षक रस्त्यावरच बसल्याने दोन तास पोलिसांना वाहतूक अडवून ठेवावी लागली.
मोर्चाचे नेतृत्व महिलांकडे
मराठा मोर्चाच्या पावलावर पाऊल टाकत शिक्षक संघटनांच्या महामोर्चाचे नेतृत्वही महिला शिक्षिकांकडे देण्यात आले होते. सुनिता जतकर, नंदा इटकर, वनिता धुरळे, कल्पना दुल्लरवार, पडलवार, नंदा राऊत, संध्या कवडे या शिक्षिका मोर्चाच्या अग्रभागी होत्या. त्यांच्याच शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या नावे मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात दिले. बदली धोरणामुळे सर्वाधिक फटका शिक्षिकांना बसणार आहे. शिवाय, आॅनलाईन कामांच्या नावाखाली शिक्षिकांना रात्रीबेरात्री काम करावे लागत आहे. सर्वाधिक त्रस्त असल्यानेच महिलांनी मोर्चाचे नेतृत्व स्वीकारल्याची माहिती यावेळी समन्वय समितीने दिली. हा मोर्चा ऐतिहासिक असल्याचा दावाही शिक्षक संघटनांकडून केला जात आहे.