वणीत घातक शस्त्रसाठा जप्त
By admin | Published: March 22, 2016 02:31 AM2016-03-22T02:31:01+5:302016-03-22T02:31:01+5:30
वणी पोलिसांनी वेकोलि कर्मचाऱ्याची कार आणि घरातून रविवारी रात्री घातक शस्त्रसाठा जप्त केला. त्यात देशी बनावटीचे
वणी : वणी पोलिसांनी वेकोलि कर्मचाऱ्याची कार आणि घरातून रविवारी रात्री घातक शस्त्रसाठा जप्त केला. त्यात देशी बनावटीचे हॅन्डमेड शॉटगण, एके-४७ रायफलीचे १३ जिवंत काडतूस, दोन हत्तीमार राऊंड, चार धारदार लोखंडी तलवारी आदी शस्त्रांचा समावेश आहे.
या प्रकरणी जतींदरसिंग ऊर्फ कालू सज्जन सिंग (३४), गॅरी आॅस्टींग जोसेफ (३३) दोघे रा. भालर वसाहत, विजय सिंग नवलकिशोर सिंग (३५) रा. बोधेनगर चिखलगाव ता. वणी या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध शस्त्र प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३/२५, ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. ही घातक शस्त्रे कोठून आणि कोणासाठी आणली गेली, गेल्या किती वर्षांपासून हा शस्त्रांचा व्यापार सुरू आहे, त्यात कोण-कोण सहभागी आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. अटकेतील तीन आरोपींपैकी एक वेकोलिचा कर्मचारी आहे. तर दुसरा अनुकंपातत्वावर वेकोलिमध्ये नोकरीसाठी प्रयत्नरत आहे. वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांना वाहनातून शस्त्रसाठा जाणार असल्याची टीप मिळाली होती. त्यावरून त्यांनी लालगुडा भागातील एमआयडीसी परिसरात नाकेबंदी केली. दरम्यान वणीकडून आलेल्या एम.एच.३१-एएच-९९९७ या कारची झडती घेतली असता त्यात जतिंदरसिंग याच्या कमरेला देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर खोचलेले आढळले. तर कारमध्ये दोन धारदार तलवारी लपविलेल्या आढळल्या. त्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान जतिंदरसिंग याच्या भालर वसाहतीतील घरीसुद्धा मोठ्या प्रमाणात अग्नी शस्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. त्यात प्रामुख्याने एके-४७ च्या १३ जीवंत काडतुसांचा समावेश आहे. या शस्त्रसाठा जप्तीने वणी विभागातील घातपाती कारवायांची संभाव्य तयारी उघड झाली. उपविभागीय अधिकारी माधव गिरी यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मुकुंद कुलकर्णी, एपीआय दीपक पवार, सुदर्शन वानोळे, सैय्यद साजीद, डोमाजी भादीकर, सुनील खंडागळे, रूपेश पाली, सुधीर पांडे, शेख नफीज, रत्नपाल मोहोडे, प्रकाश गोर्लेवार, विजय बुरुजवाडे, राजेंद्र कमनर, प्रमोद जिड्डेवार यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)