वणीत जिनिंगच्या सात एकराला चार वर्षांपूर्वी २१ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 09:56 PM2017-11-12T21:56:08+5:302017-11-12T21:56:19+5:30
येथील वसंत सहकारी जिनिंगला सात एकर जागेच्या लिलावापोटी चार वर्षांपूर्वी तब्बल २१ कोटी ३० लाख रुपये मिळाले. असे असताना यवतमाळातील मोक्क्याच्या जागी असलेल्या जिनिंगच्या......
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : येथील वसंत सहकारी जिनिंगला सात एकर जागेच्या लिलावापोटी चार वर्षांपूर्वी तब्बल २१ कोटी ३० लाख रुपये मिळाले. असे असताना यवतमाळातील मोक्क्याच्या जागी असलेल्या जिनिंगच्या आठ एकर जागेसाठी केवळ सात कोटी मिळतात कसे? असा प्रश्न स्थानिक सहकार क्षेत्रातील नेते मंडळी उपस्थित करीत आहे. परंतु सुमारे २४ कोटींची ही जागा अवघ्या सात कोटीत बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी जिल्हा बँकेच्या तमाम संचालकांची ‘एक-जूट’ झाल्याने हा ‘व्यवहार’ होणार हे निश्चित झाले आहे.
यवतमाळ सहकारी जिनिंगची धामणगाव रोडवरील आठ एकर जागा जिल्हा मध्यवर्ती बँकेने विक्रीस काढली. त्यापोटी आलेले अधिकाधिक सात कोटींचे टेंडर मंजूर करण्याबाबत शुक्रवारी जिल्हा संचालक मंडळाच्या बैठकीत एकमत झाले. केवळ अन्य प्रक्रियेचे बँकेचे २८ लाख देणार कोण? याचा वाद सुरू आहे. ही रक्कम निविदाधारकानेच द्यावी, अशी बँकेची भूमिका आहे. हे २८ लाख मिळताच बँक सात कोटीच्या टेंडरला रितसर मंजुरी देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची माहिती आहे.
ना कुणाला चिंता, ना खंत
सहकारी संस्थेची जागा नाममात्र रकमेत विकली जात असतानाही बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत फारशी कुणी चिंता वा खंत दाखविल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे कुणी छातीठोकपणे पुढे येऊन विरोध करण्याची अपेक्षाच मावळली आहे.
भाजपापुढे काँग्रेस-राकाँच्या नांग्या
बँकेचे बहुतांश संचालक काँग्रेस-राष्टÑÑवादीशी जवळीक ठेवणारे असले तरी या व्यवहारात सत्ताधारी भाजपापुढे बोलण्याची हिम्मत बैठकीत एकाही संचालकाने दाखविलेली नाही. यावरून बँक आणि सदर जिनिंगचे कर्तेधर्ते ‘मूग गिळून’ बसल्याचे स्पष्ट होते.
या अनुषंगाने जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या अलिकडेच झालेल्या लिलावावर नजर टाकली असता वणीतील मोठा व्यवहार पुढे आला. वणी-यवतमाळ रोडवर ५० वर्षांपासून वसंत सहकारी जिनिंग कार्यरत होती. अलिकडे ती शहरात आल्याने तिला इतरत्र शिप्ट करावे, असे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले. तिचे शिप्टींग खर्चिक असल्याने अखेर ही जिनिंग चार वर्षांपूर्वी विक्री केली गेली.
अध्यक्षांची रोखठोक भूमिका
या जिनिंगच्या सात एकर जागेचा भाव पहिल्यांदा लिलावात नऊ कोटी १५ लाख रुपये आला. मात्र कंत्राटदारांनी रिंग केली असल्याचे लक्षात येताच खुद्द जिनिंगच्या अध्यक्षांनीच रोखठोक भुमिका घेत हा लिलाव रद्द केला. शेतकरी भागधारकांच्या कष्टाच्या पैशावर उभी झालेली ही जिनिंग अशी बेभाव विकू देणार नाही, अशी आक्रमक भुमिका अध्यक्षांनी घेतली. अध्यक्षांनी त्यानंतर दुसºयांदा रिंग होऊ न देता ‘प्रामाणिक’ भावनेने लिलाव केला असता सात एकर जागेची तब्बल २१ कोटी ३० लाख रुपये किंमत आली.
एक कोटींची आॅफर धुडकावली
एका नामांकित बिल्डरानेच हा लिलाव घेतला. जिनिंगची ही जागा नऊ कोटीत विकावी म्हणून त्यावेळी यवतमाळातील एका राजकीय बिल्डरने वसंत जिनिंगच्या कर्त्याधर्त्यांना एक कोटींची आॅफरही दिली होती. मात्र वैयक्तिक स्वार्थापेक्षा सहकाराचे हित महत्वाचे असे सांगून ही आॅफर धुडकावण्यात आली. त्यामुळे या जागेला २१ कोटी रुपये भाव मिळाला.
जादा भावासाठी वाढविली स्पर्धा
या लिलावासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली होती. संभाव्य खरेदीदारांना जिनिंगतर्फे स्वत: संपर्क करून बोलीत सहभागी होण्याची विनंती केली गेली होती. गावात आॅटोरिक्षाने लाऊडस्पिकरवरून लिलावाचा प्रचार-प्रसार केला गेला होता.
जिल्हा बँकेकडून केवळ खानापूर्ती
यवतमाळ जिल्हा बँकेने मात्र यवतमाळ शेतकरी सहकारी जिनिंगची जागा विक्री अखेरपर्यंत गुलदस्त्यात ठेवली. त्याची जाहिरात चक्क इंग्रजी वृत्तपत्रात देऊन केवळ खानापूर्ती केली. यावरून जिल्हा बँक व जिनिंग संचालकांची या व्यवहारातील अप्रामाणिकता, वैयक्तिक स्वार्थ, सहकार चळवळ मातीत घालण्याचे धोरण उघड होते.
वसंत जिनिंगच्या सात एकर जागा विक्रीच्या वेळी सर्व काही खुले होते. कुठेही छुपेपणा नव्हता. लिलावाची अधिकाधिक प्रसिद्धी करून स्पर्धा वाढविली गेली. त्यामुळेच सात एकर जागेला २१ कोटी रुपये मिळाले. यवतमाळात धामणगाव रोड सारख्या मोक्क्याच्या ठिकाणी आठ एकरला केवळ सात कोटी रुपये मिळतात, हा व्यवहारच मुळात कुणाला पटण्यासारखा नाही. फेरनिविदा व त्याची व्यापक प्रसिद्धी ‘प्रामाणिक’पणे झाल्यास वणी सारखा भावातील दुप्पट-तिप्पटीचा चमत्कार सहज होऊ शकतो.
- अॅड. देविदास काळे
अध्यक्ष, वसंत सहकारी जिनिंग, वणी.