वणीत ‘व्हायरल फ्ल्यू’चे थैमान
By admin | Published: November 6, 2014 11:04 PM2014-11-06T23:04:09+5:302014-11-06T23:04:09+5:30
वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे शहरासह तालुक्यात विविध रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुल्ल दिसून येत आहे.
वणी : वातावरणातील बदल, घाणीचे साम्राज्य आणि आरोग्य विभागाच्या अनास्थेमुळे शहरासह तालुक्यात विविध रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुल्ल दिसून येत आहे. नागरिकांचे आरोग्यच धोक्यात सापडले आहे.
गेल्या महिन्यापासून वातावरणात सतत बदल होत आहे. या वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. ‘व्हायरल फ्ल्यू’ने तर नागरिकांना भंडावून सोडले आहे. लहान बालकांनाही विविध आजारांनी ग्रासले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच रूग्णालये गर्दीने फुलून गेले आहे. प्रत्येक दवाखान्यात दररोज गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहे. एकप्रकारे डॉक्टर मंडळीसाठी पर्वणीच ठरली आहे.
सर्दी, ताप, खोकला, अंग दुखणे, हुडहुडी भरून ताप येणे, आदी आजार तर आता सामान्य झाले आहे. अनेकांना या आजारांची लागण झाली आहे. त्यातूनच मलेरिया, डेंग्यू सदृश्य आजारांनी डोके वर काढले आहे. अनेकांना रूग्णालयात भरती राहावे लागत आहेत. या आजारांमुळे नागरिकांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. मात्र आरोग्यावर खर्च करणे त्यांना भाग पडत आहे. नाईलाजास्तव अनेकांना कर्ज काढूनही उपचार करवून घ्यावा लागत आहे.
शहरातील पॅथॉलॉजीही सध्या गर्दीने फुलून गेल्या आहेत. तेथेही रूग्णांची रांग दिसून येत आहे. थुंकी, रक्त, लघवी तपासण्यासाठी रूग्णांची गर्दी उसळत आहे. मात्र आरोग्य विभाग सुस्तच दिसून येत आहे. कागदोपत्री सर्व्हेक्षण मोहीम राबवून उपाययोजना केल्या जात आहे. डास निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होताना दिसून येत नाही. डासांची पैदास रोखण्यासाठी उपाययोजना होताना दिसत नाही. ग्रामीण भागात काम सुरू असल्याचे मात्र सांगितले जाते. मात्र आरोग्य विभाग नेमके कोणते काम करीत आहे, याचा थांगपत्ता कुणालाच लागत नाही.
वणीतील ग्रामीण रूग्णालयातही रूग्णांची प्रचंड गर्दी आहे. रूग्णालयातील तीनही विभाग रूग्णांच्या दाटीवाटीने गजबजून गेले आहेत. त्यात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या रूग्णालयात प्रसूतीसाठीही अनेक महिला दाखल आहेत. त्यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. विविध आजारांच्या थैमानामुळे या बालकांनाही विविध आजार बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज गुरूवारी गुरू नानक जयंतीनिमित्त सुटी असल्याने तर हे रूग्णालय वाऱ्यावरच होते.
दुपारी १.३0 पर्यंत वैद्यकीय अधिकारी उपस्थित होत्या. मात्र सुटी असल्याने बाह्यरूग्ण विभाग, औषधी वाटप केंद्र बंद होते. गरज पडल्यास ‘आॅन कॉल’ डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण केले जाते, असे तेथे सांगण्यात आले. अर्थात सुटीच्या दिवशी सर्वच रूग्ण वाऱ्यावरच असतात, हे यावरून स्पष्ट झाले. (कार्यालय प्रतिनिधी)