वणीत ६४ लाखांचा बंधारा रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 09:34 PM2019-02-11T21:34:04+5:302019-02-11T21:34:36+5:30
पावसाळ्यात अधिकाअधिक पाणी अडविता यावे, यासाठी वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीवरील वामनघाट परिसरात ६४ लाख रुपये खर्चाचा बंधारा बांधण्याचे काम पालिकेने मागील वर्षी सुरू केले खरे; परंतु वर्ष लोटूनही हा बंधारा अर्धवट अवस्थेत उभा आहे. पालिका प्रशासनाकडून वाळू टंचाईचे कारण पुढे केले जात असले तरी काम थांबण्यामागे वेगळेच कारण असल्याची चर्चा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : पावसाळ्यात अधिकाअधिक पाणी अडविता यावे, यासाठी वणी शहरातून वाहणाऱ्या निर्गुडा नदीवरील वामनघाट परिसरात ६४ लाख रुपये खर्चाचा बंधारा बांधण्याचे काम पालिकेने मागील वर्षी सुरू केले खरे; परंतु वर्ष लोटूनही हा बंधारा अर्धवट अवस्थेत उभा आहे. पालिका प्रशासनाकडून वाळू टंचाईचे कारण पुढे केले जात असले तरी काम थांबण्यामागे वेगळेच कारण असल्याची चर्चा आहे.
एका राजकीय नेत्याच्या पुत्राला या बंधाºयाचे काम देण्यात आले होते. निविदेनुसार या बंधाऱ्यासाठी दुय्यम दर्जाचे लोखंडी गज वापरण्यात आले. परंतु हे कंत्राट सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या पुत्राला देण्यात आल्याने या प्रकाराकडे पालिका प्रशासनाने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. मागील वर्षी निर्माण झालेल्या पाणी टंचाईमुळे पालिकेने या बंधाºयाचे काम त्वरित सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र कंत्राटदाराच्या कासवगतीने अद्यापही हा बंधारा पूर्णत्वास येऊ शकला नाही. काम सुरू झाले तेव्हा मुबलक प्रमाणात रेती उपलब्ध होती. त्याचवेळी कंत्राटदाराने रेतीची साठवणूक का केली नाही, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आतापर्यंत नगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला २८ लाख रुपये अदा केले. मात्र आतापर्यंत झालेल्या कामावर खरेच २८ लाख रुपये खर्च झाले का, हादेखील संशोधनाचा विषय आहे. सध्या वणी शहराला नव्या नळयोजनेद्वारे वर्धा नदीवरून पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु भविष्यात या नळयोजनेत काही बिघाड झाला, तर पर्यायी व्यवस्था म्हणून निर्गुडा नदीत पाण्याचा साठा अतिशय आवश्यक आहे. दुष्काळी स्थितीमुळे यंदाही वणीकरांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.
मारेगाव तालुक्यातील नवरगाव धरणातून ठराविक वेळी निर्गुडा नदीत पाणी सोडले जाते. परंतु सक्षम बंधाºयाअभावी हे पाणी पुढे वाहून जाते. त्यामुळे अर्धवट बांधण्यात आलेला हा बंधारा कुचकामी ठरत आहे. बंधाºयाच्या ठिकाणी मलबा तसाच पडून तो उचलण्याचे सौजन्यदेखील संबंधित कंत्राटदाराने दाखविले नाही.