वणीत वाहतुकीचा उडाला बोजवारा
By Admin | Published: June 13, 2014 12:35 AM2014-06-13T00:35:23+5:302014-06-13T00:35:23+5:30
शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी
वणी : शहर आणि परिसरात वाहतुकीचा पूर्णत: बोजवारा उडाला असून वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. टिळक चौक, गांधी चौक, आंबेडकर चौक, लालपुलिया परिसर आदी ठिकाणी तर दररोजच अघोषित ‘चक्का जाम’ची परिस्थिती उद्भवते. मात्र या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात वाहतूक विभागाला अपयश येत आहे.
वणी शहराचा केंद्रबिंदू असलेल्या टिळक चौकातील नगरपरिषद कॉम्प्लेक्ससमोर तर दिवसभर अनेक वाहने अस्ताव्यस्त उभी राहातात. या अस्ताव्यस्त वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. याच चौकात अनेक ट्रॅव्हल्सही उभ्या राहात असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याचाच भाग झाली आहे. हा मुख्य चौक आहे. याच चौकातून बाहेर गावांतील ग्रामस्थांना शहरात प्रवेश करावा लागतो.
टिळक चौकात पाच रस्ते एकत्र येतात. त्यापैकी एक रस्ता श्रीराम मंदिराकडे, दुसरा डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे, तिसरा एसपीएम विद्यालयाकडे, चौथा बसस्थानक व यवतमाळकडे, तर पाचवा रस्ता वरोरा-नागपूरकडे जातो. हे सर्वच रस्ते नेहमी गजबजलेले असतात. याच पाचही मार्गावर अनेक मुख्य प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये आहेत. परिणामी या सर्व रस्त्यांवर नेहमी वाहनांची वर्दळ असते. अर्थातच टिळक चौकातूनच मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. मात्र अनेक वाहनधारक या चौकात आल्यानंतर आपली वाहने रस्त्यावरच अस्ताव्यस्त उभी करतात. त्याचा फटका रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारक तसेच पादचाऱ्यांना सहन करावा लागतो.
या चौकात नगरपरिषदेचे कॉम्प्लेक्सही आहे. त्यात अनेक दुकाने लागलेली आहेत. या दुकानांसमोर तर अनेक वाहने आडवी-तिडवी लावलेली असतात. वाहनधारक आपले वाहन रस्त्यावर उभे करून खुशाल दुकानांमध्ये जातात. त्यातील काही वाहने दिवसभर एकाच जागी उभी दिसतात. वाहनधारक निर्धास्त होऊन दुसरीकडे फिरतात. ही वाहने दिवसभर तेथेच उभी असूनही वाहतूक पोलिसांचे त्याकडे लक्ष नसते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. त्याचा त्रास जनतेला सहन करावा लागतो. वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतो.
याच चौकातून वरोरा-चंद्रपूर-नागपूरकडे जाणाऱ्या मार्गावर दुभाजक आहे. या दुभाजकाच्या एका बाजूला नगरपरिषदेच्या कॉप्म्लेक्समधील दुकाने, तर दुसऱ्या बाजूला आॅटो उभे असतात. त्यातच अनेक वाहने रस्त्यावर उभी राहात असल्याने रस्ता अरुंद होतो. त्यामुळे सामान्य वाहनधारकांना तेथून वाहन काढणे कठीण होते. रस्त्यावर दिवसभर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे नगरपरिषद कॉम्प्लेक्समधील दुकानदारांनाही त्रास सहन करावा लागतो. दुकानात जाणाऱ्या ग्राहकांना तारेवरची कसरत करावी लागते. गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्रीराम मंदिर चौक, नगरपरिषद परिसर, दीपक टॉकिज आदी परिसरातही वाहतुकीची कोंडी होते. वाहनांचे कर्णकर्कष आवाज नागरिकांच्या कानठळ्या बसवितात. मात्र अनेकदा वाहतूक पोलीस त्यांच्या जागेवर दिसतच नाही. वणीसाठी आता स्वतंत्र वाहतूक पोलीस शाखा झाल्याने या सर्व प्रकाराला आळा बसेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र पूर्वीच्या स्थितीत आणि आत्ताच्या स्थितीत तसूभरही फरक पडलेला दिसत नाही. (कार्यालय प्रतिनिधी)