विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा तहसीलवर मोर्चा
By admin | Published: January 3, 2016 02:56 AM2016-01-03T02:56:11+5:302016-01-03T02:56:11+5:30
शेतकरी व शेतजुरांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथील टिळक चौकातून काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
एसडीओंना दिले निवेदन : वणी तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर व कार्यकर्त्यांनी घेतला होता सहभाग
वणी : शेतकरी व शेतजुरांच्या ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी येथील टिळक चौकातून काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा टिळक चौकातून दुपारी १ वाजता निघाला. शासनाच्या विरोधात घोषणा देत शेतकरी, शेतमूजर व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा टिळक चौक, खाती चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, टागौर चौक, आंबेडकर चौकातून फिरून तहसील कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलीया व वामनराव कासावार यांनी महागाई व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी देण्यात यावी, आणेवारी ५० टक्केपेक्षा कमी करून दुष्काळ जाहीर करावा, पीक आणेवारीची पद्धत बदलविण्यात यावी, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, भारनियमन बंद करून शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा करावा, शेतकऱ्यांना त्वरित वीज जोडणी द्यावी, शेतमालाला महागाई निर्देशांकाप्रमाणे भाव द्यावा, सोयाबीनला पाच तर कापसाला प्रती क्विंटल सात हजार रूपये भाव द्यावा, नवरगाव, बेंबळा धरणाचे पाणी कालव्याद्वारे शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवावे, कालवा दुरूस्त करावा, नवीन सभासदांना जिल्हा बँकेने पीक कर्जाचे वाटप करण्यात यावे.
तसेच वनजमीन कसणाऱ्यांना पट्टे द्यावे, मिरची पिकांवरील रोगाची नुकसान भरपाई द्यावी, पीक विमा मंजूर करून त्वरित वाटप करावे, कापसाला प्रति क्विंटल दोन हजार रूपये बोनस द्यावा, रोजगार हमीची कामे सुरू करावी, शेतकरी व शेतमजुरांना पेंशन लागू करावी, वणी शहराला नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करावी व शहरातील शासकीय जागेवरील झोपडपट्टींना पट्टे द्यावे, आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चाचे नेतृत्व चंद्रपूरचे माजी खासदार नरेश पुगलीया, माजी आमदार वामनराव कासावार, वसंत जिनिंगचे अध्यक्ष अॅड.देवीदास काळे यांनी केले होते. मोर्चात काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत गोहोकार, राजाभाऊ पाथ्रडकर, राकेश खुराणा, मोरेश्वर पावडे, प्रा.टिकाराम कोंगरे, पुरूषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, सुनील कातकडे, शरद ठाकरे, संजय खाडे, प्रसाद ठाकरे, गोपाल भदोरीया, भास्कर गोरे, बाबाराव चौधरीसह तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते सहभागी झाले होते. (कार्यालय प्रतिनिधी)