वसंतराव नाईक कृषी पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 11:35 AM2019-08-10T11:35:22+5:302019-08-10T11:36:22+5:30
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार राज्यातील नऊ प्रयोगशील शेतकरी व एका कृषी शास्त्रज्ञाला जाहीर झाला आहे. येत्या १८ ऑगस्टला येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे वसंतराव नाईक कृषी पुरस्कार राज्यातील नऊ प्रयोगशील शेतकरी व एका कृषी शास्त्रज्ञाला जाहीर झाला आहे. येत्या १८ ऑगस्टला येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात हे पुरस्कार वितरित केले जाणार आहे.
वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या ४० व्या स्मृतीदिनी १८ ऑगस्टला दुपारी १२.१५ वाजता वसंतराव नाईक ‘कृषी गौरव पुरस्कारा’चे वितरण केले जाणार आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण आशिया जैवतंत्रज्ञान केंद्र नवी दिल्लीचे अध्यक्ष तथा माजी कुलगुरु डॉ.चारूदत्ता माई राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरु डॉ.आशीष पातुरकर उपस्थित राहणार आहे. यानंतर दुपारी ३.१५ वाजता ‘दुग्ध प्रक्रिया आणि मूल्यवर्धन’ या विषयावर कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन व सत्कारमूर्ती शेतकऱ्यांचे अनुभव कथन होणार आहे.
याप्रसंगी वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान समितीचे स्वागताध्यक्ष डॉ.एन.पी.हिराणी, माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक, विजय पाटील चोंढीकर, अविनाश नाईक, प्रा.गोविंद फुके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार असल्याचे वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर, उपाध्यक्ष धनंजय सोनी, कोषाध्यक्ष जय नाईक, सचिव प्राचार्य डॉ.उत्तम रुद्रवार आदींनी कळविले आहे.
पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची नावे
कोकण विभाग :- अनुभव शरद मांजरेकर मु. बदलापूर, जि. ठाणे (उन्हाळी झेंडू), डॉ. संदीप चोपडे संगमेश्वर जि. रत्नागिरी (वनशेती, बांबू). पश्चिम महाराष्ट्र :- अशोक दशरथ भाकरे, मु. धामोरी जि. अहमदनगर (फळभाजी, रोपवाटिका), अतुल सोपानराव तांबे, मु. तांबेवाडी जि. अहमदनगर (विक्रमी कांदा उत्पादन). विदर्भ :- किशोर खिरूसिंग राठोड, मु. काटखेडा जि.यवतमाळ (दुग्ध व्यवसाय), दादाराव जनार्दन घायर, मु. ब्राम्हणवाडी थडी, जि. अमरावती (विक्रमी केळी उत्पादन), राहुल गणेशराव रौंदळे, मु. निमखेडबाजार जि. अमरावती (विक्रमी सीताफळ उत्पादन). मराठवाडा :- मेघा विलासराव देशमुख, मु. झरी जि. परभणी (विक्रमी पेरू उत्पादन), अभिजीत मदनराव वाडेकर, मु. मंगुजळगाव, जि. जालना (विक्रमी कारले उत्पादन). कृषी शास्त्रज्ञ :- प्रा.डॉ.राजेश्वर रामदास शेळके.