‘वसंत’ची वाटचाल अधोगतीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:01 AM2017-11-03T01:01:30+5:302017-11-03T01:01:42+5:30
‘कामधेनू’ अशी सार्थ बिरूदावली असलेला वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला.
अविनाश खंदारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : ‘कामधेनू’ अशी सार्थ बिरूदावली असलेला वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला. विदर्भातील एकमेव सहकारी तत्त्वावर सुरू असलेला हा कारखाना आता लवकरच खासगी व्यवस्थापनाच्या ताब्यात जाईल आणि तेथून कधी विक्री होईल, हेही शेतकºयांना कळणार नाही. काँग्रेसकडून कारखाना भाजपाने ताब्यात घेऊन या कारखान्याला आगीतून फुफाट्यातच टाकले आहे.
शेतकºयांच्या घामातून आणि माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीतून उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे साखर कारखाना उभा राहिला. १९६९ सालापासून या कारखन्याच्या चिमणीतून अविरत धूर निघत आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी या कारखान्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केले. विदर्भ आणि मराठवाड्यातील पाच तालुक्यातील शेतकºयांसाठी हा कारखाना ‘लाईफलाईन’ ठरला. शेकडो कामगार, अधिकारी यांना प्रत्यक्ष तर हजारो हातांना या कारखान्यामुळे काम मिळाले. प्रगतीचे शिखरे गाठत या भागातील शेतकºयांनी आपली उन्नती साधली. साखर कारखाना म्हणजे या भागासाठी कामधेनू ठरला.
परंतु सहकारातील राजकारण येथेही आडवे आले. कारखाना हळूहळू आर्थिक डबघाईस जावू लागला. परंतु कारखाना वाचला तरच शेतकरी जगेल, या भूमिकेतून कारखान्याची चाके फिरती ठेवली. परंतु गत दोन वर्षांपासून कारखाना अधिकच आर्थिक टंचाईच्या गर्तेत सापडला. गत वर्षी तर केवळ २५ हजार टन एवढे निच्चांकी गाळप करण्याची नामुष्की कारखान्यावर आली. त्यातच ३० महिन्यांपासून कामगारांचे वेतन नाही. कारखाना सुरू कसा करावा, असा प्रश्न निर्माण झाला. त्यातूनच सत्ताधारी भाजपाच्या ताब्यात कारखाना देण्याच्या हालचाली सुरू झाल्या. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव जवळगावकर यांना अध्यक्षपदावरून हटवून भाजपाचे अॅड.माधवराव माने अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या. भाजपा सरकार कारखाना सुरू करण्यासाठी पैसे देईल, अशी आशा होती. पंरतु सुमारे १०० कोटी कर्ज असलेल्या कारखान्याच्या थकहमीसाठी शासनाने हात वर केले. कर्ज हवे असेल तर संचालक मंडळाने आपल्या मालमत्तेचे गहाणखत करून द्यावे, असा प्रस्ताव पुढे ठेवला. परंतु कारखान्याच्या हिताच्या गोष्टी करणाºया संचालक मंडळातील कुणालाही हा प्रस्ताव पचनी पडला नाही. अखेर पुसदच्या विश्रामगृहावर बुधवारी संचालक मंडळाची सभा झाली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला.
विदर्भातील सहकारी तत्त्वावर सुरू असलेला ‘वसंत’ हा एकमेव सहकारी साखर कारखाना आहे. परंतु आता हा मानही लवकरच हिरावला जाणार आहे. कारखाना कुण्यातरी बड्या कारखानदाराला भाडेतत्त्वावर दिला जाईल. त्यानंतर हळूच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याची झालेल्या अवस्थेसारखी त्याचीही अवस्था होईल. कुणी तरी साखर सम्राट हा कारखाना विकत घेईल आणि शेतकºयांची कामधेनू साखर सम्राटाच्या दावणीला बांधली जाईल. साखर कारखाना जगवायचा असेल तर सर्व राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज आहे. कारखाना एकदा भाडेतत्त्वावर गेला की शेतकºयांचे कुणी ऐकणार नाही. कामगारांना कुणी उभे करणार नाही. पुष्पवंती अर्थात सुधाकर नाईक साखर कारखान्याच्या कामगारांचे जसे सध्या हाल सुरू आहे, त्याच वाटेवर येथील कामगारही जातील.