मुलांच्या शिक्षणासाठी साजेगावचे पालक झाले ‘वासुदेव’
By admin | Published: February 21, 2017 01:23 AM2017-02-21T01:23:51+5:302017-02-21T01:23:51+5:30
भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर एका टोपलीत श्रीकृष्णाला ठेऊन यमुना नदी पार केली होती.
पुलाचा अभाव : कंबरभर पाण्यातून दररोज प्रवास, वघुळ शिवारातील शेती कसणेही झाले कठीण, दोनशे कुटुंबांची फरपट
मुकेश इंगोले दारव्हा
भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर एका टोपलीत श्रीकृष्णाला ठेऊन यमुना नदी पार केली होती. एका पित्याची महाभारतातील हीच धडपड आता दारव्हा तालुक्यातील साजेगाव येथील पालकांच्या दररोज नशिबी आली आहे. मुलांना शाळेत पोहोचविण्यासाठी अडाण नदी पार करताना चक्क कंबरभर पाण्यातून मुलांना खांद्यावर घेऊन जावे लागते. दररोजचा हा शिक्षणाचा प्रवास पालकांच्या नशिबी असून पालक आणि चिमुकल्याचा जीवही धोक्यात आला आहे. मात्र प्रशासनाने अद्यापपर्यंत अडाण नदीवर पूल बांधला नाही.
दारव्हा तालुक्यातील अडाण नदीच्या तीरावर साजेगाव आहे. दोन हजार लोकसंख्येच्या या गावातील शेती मात्र नदीच्या पैलतीरावर वघूळ शिवारात आहे. शेती कसणे अडचणीचे होत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी वघूळ गावाजवळच आश्रय घेतला. आज त्या ठिकाणी दोनशे लोकवस्तीची वसाहत आहे. शेतीची समस्या सुटली. मात्र मुलांच्या शिक्षणाची समस्या मात्र निर्माण झाली. नदीच्या पैलतीरावर असलेल्या शाळेत पोहोचविण्यासाठी पूल नसल्याचा मोठा अडथळा येऊ लागला. यावर पालकांनी उपाय काढला. कंबरभर पाण्यातून मुलांना खांद्यावर बसवून साजेगावच्या शाळेत नेऊन सोडतात. सायंकाळी मुलांना याच पद्धतीने घेऊनही येतात. काही जणांनी तात्पुरती होडी तयार केली आहे. परंतु या होडीवर तोल जाण्याची भीती असते. चिमुकल्यांचे काही बरे वाईट नको म्हणून पालक आपल्या मुलांना खांद्यावर बसवूनच नदी पार करतात. गत अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. पूर्वी या नदी पात्राला पावसाळ्यातच पाणी रहायचे. मात्र २५ वर्षापूर्वी अडाणवर म्हसनी येथे मध्यम प्रकल्प झाला. त्यामुळे सिंचन व इतर कारणाने प्रकल्पाचे पाणी नदी पात्रात सोडले जाते. त्यामुळे १२ ही महिने ही नदी खळखळून वाहते. त्यामुळेच मोठी अडचण झाली आहे. मात्र पूल बांधण्यासाठी कुणीही पुढाकार घेतला नाही. गावातील नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांना पुलासाठी साकडे घातले. परंतु कुणीही दखल घेतली नाही.
पावसाळ्यात मिळते सुटी
अडाण नदीला पावसाळ्यात पूर आला की, या विद्यार्थ्यांना आठ-आठ दिवस सुटी मिळते. पुराच्या पाण्यातून चिमुकल्यांना घेऊन जायची कुणीही हिंमत करीत नाही. त्यामुळे पालक नाईलाजाने विद्यार्थ्यांना शाळेत नेऊ शकत नाही. नदीचे पाणी कमी होईपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागते. अनेक विद्यार्थ्यांना तर दुसऱ्या वर्गानंतरच शाळा सोडण्याची वेळ आली आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी शोधून शाळेत पाठवित आहे. तर दुसरीकडे साजेगावात विद्यार्थ्यांची इच्छा असूनही पुलाअभावी शिक्षण सुटण्याची भीती आहे.
पुलाच्या मागणीसाठी आतापर्यंत लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. मात्र केवळ आश्वासनापलिकडे काहीही झाले नाही. एवढ्या महत्वाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने गावामध्ये प्रचंड नाराजी आहे.
- राजू जाधव, साजेगाव