वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये फूट

By admin | Published: May 5, 2017 02:17 AM2017-05-05T02:17:25+5:302017-05-05T02:17:25+5:30

वणी तालुक्यातील बंद पडलेल्या पिंपळगाव वेकोलि कोळसा खाण बंद पडल्यानंतर या खाणीत कार्यरत १८७ कर्मचाऱ्यांचे

VECOLOGY employees split | वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये फूट

वेकोलि कर्मचाऱ्यांमध्ये फूट

Next

पिंपळगाव कोळसा खाण : बदलीच्या विषयाने कर्मचाऱ्यांचे कुटुंबही धास्तावले
वणी : वणी तालुक्यातील बंद पडलेल्या पिंपळगाव वेकोलि कोळसा खाण बंद पडल्यानंतर या खाणीत कार्यरत १८७ कर्मचाऱ्यांचे स्थानांतरण चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर क्षेत्रात येणाऱ्या गोवरी (डीप) येथील कोळसा खाणीत करण्यात आले. या विरोधात पाच कामगार संघटनांनी एकत्र येऊन एल्गारही पुकारला. मात्र कर्मचाऱ्यांचे संघटन अखेरपर्यंत कायम न राहल्याने व काही कर्मचाऱ्यांनी आंदोलनातून माघार घेतल्याने कर्मचाऱ्यांना आता गोवरी (डीप) येथे स्थलांतरीत व्हावे लागणार आहे. एकूणच कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन औटघटकेचे ठरले आहे.
विशेष म्हणजे गोवरी (डीप) खाणीचीही अवस्था बिकट असून ती बंद अवस्थेत असल्याने तेथूनही या कर्मचाऱ्यांचे अन्य राज्यात स्थलांतर होण्याची शक्यता असल्याने या कर्मचाऱ्यांचे कुटुंब धास्तावले आहे. पिंपळगाव कोळसा खाणीची स्थापना १९९३ मध्ये झाली होती. ही खाण गावाजवळ असल्याने चंद्रपूर, घुग्सूस, माजरी या क्षेत्रातील अनेक कामगारांनी त्यावेळी पिंपळगाव येथील कोळसा खाणीत स्थलांतर करून घेतले होते. कोलारपिंपरी व पिंपळगाव कोळसा खाणीत कामावर असलेले ९० टक्के कर्मचारी वणीत वास्तव्याला होते. आता हे कर्मचारी स्थलांतरीत होत असल्याने वणीच्या बाजारपेठेवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सुरूवातीला वेकोलि प्रशासनाने कोलारपिंपरी कोळसा खाण बंद केली. तेथील मणुष्यबळ पिंपळगाव कोळसा खाणीत आणले. त्यानंतर कोलारपिंपरी कोळसा खाण खासगी कंत्राटदाराला दिली. आता पिंपळगाव कोळसा खाणही बंद करण्यात आल्यानंतर आम्हाला वणी वेकोलि क्षेत्रातील अन्य कोळसा खाणीत स्थलांतरीत करण्याची मागणी कार्यरत कर्मचाऱ्यांनी केली होती.
त्यासाठी वेकोलि कामगारांच्या पाच संघटनांनी उपरोक्त मागणीसाठी १ एप्रिलपासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. २५ एप्रिलपासून वेकोलि महाप्रबंधकांच्या कार्यालयापुढे या कर्मचारी संघटनांनी धरणे आंदोलन सुरू केले. सुरूवातील सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झालेत. मात्र नंतर हळूहळू काही कर्मचाऱ्यांनी या आंदोलनातून काढता पाय घेतला व गोवारी कोळसा खाणीत रुजू होण्याचा निर्णय घेतला.
पाच दिवसात रुजू होणाऱ्या वेकोलि कर्मचाऱ्यांची संख्या वाढत गेली. अखेर आंदोलन शक्तीहिन झाल्याने पाचही कर्मचारी संघटनांनी मध्यम मार्ग स्विकारत आंदोलन गुंडाळले. त्यामुळे आता सर्वच कर्मचाऱ्यांना नाईलाजाने गोवारी कोळसा खाणीत रूजू व्हावे लागणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

गोवारीतील अव्यवस्थेने कामगारांत नाराजी
गोवारी कोळसा खाण सुरूवातीला खासगी कंत्राटदाराला चालविण्यासाठी वेकोलि प्रशासनाने दिली होती. मात्र त्याचा करार संपल्याने त्याने खाणीतून आपला गाशा गुंडाळला. तेव्हापासून ही खाण बंद अवस्थेत आहे. आता पिंपळगाव कोळसा खाणीतील कर्मचारी प्रत्यक्षात तेथे जाऊन कोळसा उत्खननाचे काम सुरू करणार आहे. मात्र त्या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचारी धास्तावले आहेत.
 

Web Title: VECOLOGY employees split

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.