वडगाव ग्रामपंचायतीची बिल्डरवर विशेष मेहेरबानी

By admin | Published: November 20, 2015 02:58 AM2015-11-20T02:58:16+5:302015-11-20T02:58:16+5:30

शहरालगतची सर्वात मोठी आणि आर्थिक सुबत्ता असलेली वडगाव ग्रामपंचायत वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे.

Vedgaon Gram Panchayat Builder Special Meherbani | वडगाव ग्रामपंचायतीची बिल्डरवर विशेष मेहेरबानी

वडगाव ग्रामपंचायतीची बिल्डरवर विशेष मेहेरबानी

Next


यवतमाळ : शहरालगतची सर्वात मोठी आणि आर्थिक सुबत्ता असलेली वडगाव ग्रामपंचायत वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. या ग्रामपंचायतीची व्यावसायिक बांधकामावर विशेष मर्जी असून अवैध रीत्या परवानगी दिल्या जात आहे. सर्वसाधारण सभेत ठराव घेण्याऐवजी थेट प्रोसेडिंग बुकातच नोंद घेतली जात आहे. नुकत्याच तीन बांधकामाच्या परवानगीवर संशय व्यक्त केला जात आहे.
जाम मार्गावरचे व्यावसायिक संकूल, पृथ्वीराजनगर २ मध्ये प्रस्तावित असलेले मंगल कार्यालय आणि सत्यनारायण ले-आऊटमधील व्यावसायिक इमारतीच्या बांधकामाची परवानगी देताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. मुळात व्यावसायिक परवानगी देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. बैठकीत हा मुद्दा चर्चेला न घेता थेट त्याची ठराव पुस्तिकेत नोंद घेण्यात आली आहे. वरील तीनही बांधकामामध्ये एकाच मालकाच्या नावाने वेगवेगळे प्लॉट आहे. या प्लॉटची भूमिअभिलेख कार्यालयातून रितसर एकत्रिकरण करणे आवश्यक आहे. त्यानंतरच येथे बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. मात्र अशी कोणतीही खातरजमा न करता थेट परवानगी देण्यात आली आहे.
दर्डा नगरमधील एका वादग्रस्त बांधकामाला परवानगी देण्यात आली. तळमजल्यावर गाळे दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात परवानगी देताना तळमजला दाखविण्यातच आला नाही. ग्रामपंचायत क्षेत्रात निर्धारित एफएसआयपेक्षा किती तरी पटीने मोठे बांधकाम तेथे सुरू आहे. त्यामुळेच या बांधकाम मालकाला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र काही दिवसातच आता रितसर परवानगी देण्यात आली आहे. नियमबाह्यरीत्या खोदकाम करून अवाढव्य बांधकाम अचानक नियमित कसे झाले असा प्रश्नही ग्रामपंचायत वर्तुळात चर्चिला जात आहे. मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीतून व्यावसायिक बांधकामाला नियम बाजूला ठेऊन परवानगी दिली जात असल्याचा सूर उमटत आहे.
दुर्गोत्सवाच्या तोंडावर ग्रामपंचायतीने ४५ हजारांची वृक्ष खरेदी केली. तर ६५ हजारांचे सिमेंट पाईप घेतले. मात्र याचा वापर कुठे झाला हे दिसत नाही. तसेच अडीच लाखांच्या मुरुमाची निविदा काढून संबंधित कंत्राटदाराच्या बिलातून रॉयल्टीचे पैसे न कापताच त्याला पूर्ण बिल देण्यात आले. अशा प्रकारे एक ना अनेक प्रकरणात तेथे अंतर्गत अनागोंदी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर हा भोंगळ कारभार विशेष गोटातील सदस्याने उघड केला आहे. बांधकामा संदर्भात नगर रचना विभागाने काटेकोरपणे नियमि घालून दिले आहेत. मात्र याची कुठेही अंमलबजावणी होत नसल्याने भविष्यात वडगाव ग्रामपंचायत परिसरात समस्या उभ्या ठाकणार आहे. मंजूर एफसआयपेक्षा अधिक बांधकाम, खोल तळघर धोकायदायक ठरणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Vedgaon Gram Panchayat Builder Special Meherbani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.