दिग्रस पोलीस ठाण्यात वीरूगिरी
By admin | Published: July 7, 2014 11:46 PM2014-07-07T23:46:49+5:302014-07-07T23:46:49+5:30
पोलिसांच्या विरोधात आणि ठाण्यातीलच १०० फूट उंच वायरसेल टॉवरवर चढून एका तरुणाने तब्बल १० तास ठिय्या दिला. आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या या अभिनव आंदोलनाने पोलिसांच्या
अभिनव आंदोलन : १० तासानंतर खाली उतरविण्यात यश
दिग्रस : पोलिसांच्या विरोधात आणि ठाण्यातीलच १०० फूट उंच वायरसेल टॉवरवर चढून एका तरुणाने तब्बल १० तास ठिय्या दिला. आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या या अभिनव आंदोलनाने पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली होती. बघ्यांचीही प्रचंड गर्दी झाली होती. महत्प्रयासाने अखेर या तरुणाला खाली उतरविण्यात प्रशासनाला यश आले आणि पोलिसांसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
दिग्रस पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी एक तरुण वायरलेस टॉवरच्या अगदी टोकावर चढून असल्याचे कुणालातरी दिसले. ही बाब पोलिसांना सांगण्यात आली. काही वेळातच ही वार्ता शहरभर पसरली. नागरिकांचे लोंढेच्या लोंढे पोलीस ठाण्याच्या परिसरात दाखल झाले. नेमका तरुण कोण आणि कशासाठी चढला हे मात्र कळायला मार्ग नव्हते. टॉवरच्या टोकावर बसलेल्या त्या तरुणापर्यंत आवाजही जात नव्हता. शेवटी नागरिकांनी आजूबाजूच्या इमारतीवर चढून त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो तरुण दिग्रस तालुक्यातील इसापूर येथील शाम मारोती गायकवाड असल्याचे पुढे आले.
इसापूर येथील रावसाहेब यशवंत साळुंके यांनी प्राथमिक मार्की शाळा काटी व रस्त्याच्या वाटा असलेली ८.३३ हेक्टर व ई-क्लासची २.८२ हेक्टर जमीन अतिक्रमण करून लागवड केली. तसेच स्मशानभूमीची जागासुद्धा नांगरल्याचा आरोप आहे. या विरोधात शाम गायकवाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. मात्र पोलिसांनी तक्रारच घेतली नाही. सदर प्रश्न महसूल विभागाचा असल्याचे सांगण्यात येत होते. आपली दखल पोलीस घेत नसल्याचे पाहून त्याने अभिनव आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
६ जुलैच्या रात्री पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या वायरलेस टॉवरवर तो चढून बसला. रात्री टॉवरवर चढताना कुणाच्याही नजरेत पडला नाही. मात्र दिवस उजाडताच टॉवरवर कुणी तरी चढून असल्याचे दिसून आले. आंदोलनाची माहिती मिळताच भाजपाचे पदाधिकारी त्या ठिकाणी पोहोचले. शामचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संवाद साधणे सुरू केले. मात्र तो पोलीस अधीक्षक दिग्रसमध्ये आल्याशिवाय खाली उतरणार नाही या भूमिकेवर ठाम होता. काही वेळात तहसीलदार नितीन देवरे या ठिकाणी पोहोचले. त्यांनी या तरुणाशी मोबाईलवरून संपर्क साधला. तसेच इसापूर येथे जाऊन त्याने केलेल्या तक्रारीची सत्य परिस्थिती जाऊन घेतली त्यानंतर पुन्हा संपर्क साधून कारवाईचे आश्वासन दिले. परंतु तो ऐकायला तयार नव्हता. इकडे पोलीस ठाण्याच्या परिसरात बघ्यांची तोबा गर्दी झाली होती. बघ्यांना आवरायचे की तरुणाला खाली उतरवायचे, असा प्रश्न पोलिसांपुढे पडला होता. गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक होत होती. गर्दीमुळे दिग्रस-आर्णी मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली होती. नागरिक आणि पोलीस शामला खाली उतरण्यासाठी विनवणी करीत होते. मात्र तो कुणाचेही ऐकत नव्हता. मात्र ११ वाजताच्या सुमारास आमदार संजय राठोड यांना संबंधितांनी मोबाईलवरून आंदोलनाची माहिती दिली. तसेच त्या तरुणाचा मोबाईल नंबरही दिला. आमदार राठोड यांनी त्या तरुणाशी संपर्क केला आणि काही वेळातच शाम खाली उतरला. खाली उतरताच नागरिकांनी एकच गलका करीत त्याला खांद्यावर उचलले आणि एक प्रकारे त्याची मिरवणूकच काढली.
शामचे दुसऱ्यांदा आंदोलन
शाम गायकवाड हा भाजपाचा पदाधिकारी असून अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा बाणा आहे. काही वर्षापूर्वी गावातील डीपी नादुरुस्त झाली होती. वीज वितरणला तक्रार देऊनही दखल घेत नव्हते. शेवटी शाम हातात विषाची बॉटल घेऊन वीज वितरणमध्ये धडकला. त्यावेळीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी वीज वितरणने १२ तासाच्या आत डीपी उभारली. त्यानंतरच विषाच्या बॉटलसह शाम कार्यालयातून बाहेर पडला होता.
रुग्णवाहिका तैनात
वायरलेस टॉवरवर चढून बसलेल्या तरुणाने ऐनवेळी उडी घेतल्यास काय असा प्रश्न निर्माण झाला होता. पोलीस बंदोबस्तासह या ठिकाणी दोन रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या होत्या. मात्र हा तरुण ज्या पद्धतीने वर चढला त्याच शिताफीने तो खालीही उतरला. (शहर प्रतिनिधी)
आंदोलनाची पूर्वतयारी जोरात
शाम गायकवाड रात्री कधीतरी टॉवरवर चढला. सोबत त्याने मोबाईल, पाण्याची बॉटल आणि बिस्टीकचे पुडे सोबत नेले होते. आंदोलन अधिक काळ चालले तर उपाशी राहावे लागू नये, म्हणून त्याने हा बंदोबस्त आधीच केला होता. नागरिक त्याला खालून आवाज देत होते तेव्हा तो केवळ हात हालवून प्रतिसाद देत होता.
टॉवरवरून सोडत होता मागणी
शाम गायकवाड वायरलेस टॉवरवर नेमका कशासाठी चढला हे सुरुवातीला कुणालाच कळत नव्हते. पोलीसही अचंबित झाले होते. नागरिकांनी जोराने ओरडून त्याला मागणी विचारली तेव्हा काही वेळातच त्याने सोबत नेलेले निवेदने टॉवरवरून खाली भिरकावली आणि त्यांच्या आंदोलनाचे कारण नागरिकांना कळले.