यवतमाळच्या शेतकरीपुत्रांचा सिनेमा फिल्मफेअर स्पर्धेत; ‘वेगळी वाट’ला ९ नामांकने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 17:24 IST2022-03-30T16:47:32+5:302022-03-30T17:24:36+5:30
ग्रामीण भागात गरिबीत जगणारा बाप आणि गरिबी असूनही पोटच्या पोरीसाठी मेहनतीची श्रीमंती जपणारा बाप... बापाच्या लाडात वाढणारी पण बापाचा होणारा अपमान पाहून आमूलाग्र बदलणारी पोरगी.. असे हे कथानक आहे.

यवतमाळच्या शेतकरीपुत्रांचा सिनेमा फिल्मफेअर स्पर्धेत; ‘वेगळी वाट’ला ९ नामांकने
अविनाश साबापुरे
यवतमाळ : यवतमाळचे शेतकरी वेगळी वाट चोखाळत नाही म्हणून ते मागे पडतात, अशी आव वारंवार उठविली जाते. मात्र आता याच मातीतल्या कृषीपुत्रांनी येथील ग्रामीण संस्कृतीचा बहारदार चेहरा थेट सिनेमाच्या पडद्यावर चितारला. या सिनेमाला अवघ्या महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाल्यावर आता तो थेट ‘फिल्म फेअर’ स्पर्धेत ९ नामांकनांसह पोहोचला आहे.
ग्रामीण माणसाच्या जगण्याची वहिवाट समजावून सांगणाऱ्या या चित्रपटाचे नाव आहे ‘वेगळी वाट’. घाटंजी तालुक्यातील देवधरी या छोट्याशा गावातील अच्युत नारायण चोपडे या शेतकरीपुत्राने हा सिनेमा साकारला. स्वत:च लिहिला आणि दिग्दर्शित केला. विशेष म्हणजे, घाटंजी, पारवा, पांढरकवडा या स्थानिक परिसरातील युवकांनाच त्यांनी सिनेमात भूमिका दिल्या. पूर्वी चारशे गावांच्या वतनदारीचे गाव असलेल्या पारवा परिसरातील शेतशिवारांमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. तर ‘इन डोअर शूट’ आबासाहेब पारवेकर विद्यालयात पार पडले. शिवाय पांढरकवडा तालुक्यातील शेतशिवार आणि पांढरकवडा येथील बसस्थानकात चित्रीकरण करण्यात आले. २०२० च्या फेब्रुवारीमध्ये हा चित्रपट यवतमाळच्या टाॅकीजसह राज्यभरात प्रदर्शित झाला होता.
ग्रामीण भागात गरिबीत जगणारा बाप आणि गरिबी असूनही पोटच्या पोरीसाठी मेहनतीची श्रीमंती जपणारा बाप... बापाच्या लाडात वाढणारी पण बापाचा होणारा अपमान पाहून आमूलाग्र बदलणारी पोरगी.. असे हे कथानक आहे.
ग्रामीण माणसांनी खेड्यातच साकारलेला हा सिनेमा आता ‘फिल्म फेअर’ पुरस्काराच्या स्पर्धेत पोहोचला आहे. इतर दिग्गजांचे सिनेमेही या स्पर्धेत असताना ‘वेगळी वाट’ला तब्बल ९ गटात नामांकने मिळाली आहेत.
बेस्ट फिल्म, बेस्ट डायरेक्टर, क्रिटिक्स अवार्ड फाॅर बेस्ट फिल्म, बेस्ट ॲक्टर इन लिडिंग रोल (फिमेल), क्रिटिक्स अवार्ड फाॅर बेस्ट ॲक्टर (फिमेल), बेस्ट स्टोरी, बेस्ट सिनेमॅटोग्राफी, बेस्ट साउंड डिझाईन, बेस्ट डिबट डायरेक्टर अशा ९ गटातून हा सिनेमा फिल्म फेअर पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. आता ३१ मार्च रोजी मुंबईत होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘वेगळी वाट’ कोण-कोणत्या गटातून पुरस्काराचा मानकरी ठरतो, याकडे संपूर्ण यवतमाळ जिल्हावासीयांच्या नजरा लागलेल्या आहेत.
यात्रेतील टाॅकीजमुळे लागला सिनेमाचा छंद
अच्युत नारायण चोपडे हे या सिनेमाचे लेखक-दिग्दर्शक आहेत. देवधरी (ता.घाटंजी) या त्यांच्या खेड्यातील यात्रेत येणाऱ्या टुरिंग टॉकिजमुळे अच्युत सिनेमाचे चाहते बनले. कथा ऐकणे आणि सांगणे हा त्यांचा बालवयातला छंद होता. तोच छंद जोपासत आता त्यांनी चक्क सिनेमा साकारला. आपल्या जिल्ह्याची बोलीभाषा, कृषी संस्कृती, माणसे जगाला दाखवावी म्हणून सिनेमा निर्मिती केल्याची भावना अच्युत चोपडे यांनी व्यक्त केली.