भाजीपाल्याआड दारूची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:23 PM2018-02-25T23:23:02+5:302018-02-25T23:23:02+5:30
बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाल्याआड दारूची तस्करी केली जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी यवतमाळात केलेल्या कारवाईत उघड झाले.
ऑनलाईन लोकमत
यवतमाळ : बंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात भाजीपाल्याआड दारूची तस्करी केली जात असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी यवतमाळात केलेल्या कारवाईत उघड झाले. बोलेरो पिकअप आणि स्कोडा कारमध्ये फुलकोबीआड देशी-विदेशी दारूचे बक्से आढळून आले. पोलिसांनी तीन लाखांच्या दारूसह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई येथील नेताजी चौक परिसरात करण्यात आली.
कारंजा येथून यवतमाळमार्गे चंद्रपूरकडे देशी-विदेशी दारू जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसंना मिळाली. त्यावूरन येथील नेताजी चौक परिसरात सापळा रचला. कारंजाकडून आलेली बोलेरो पिकअप (क्र.एम.एच.३७-जे-११९४) व त्या पाठोपाठ काळ्या रंगाची स्कोडा फाबिया (क्र.एम.एच-३१-सीआर-४३९०) या दोन्ही गाड्या थांबवून तपासणी केली. त्यावेळी बोलेरो पिकअपमध्ये मागच्या बाजूला फुलकोबी आणि आतील बाजूला ८० बॉक्स देशी दारू, एका बॉक्समध्ये १०० प्रमाणे आठ हजार गण बॉटल, दुसºया २० बॉक्समध्ये १०० गण क्षमतेच्या दोन हजार बॉटल्स असा ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर स्कोडा वाहनाच्या डिक्कीमध्ये सात बॉक्स विदेशी दारू किंमत ४९ हजार, दुसºया बॉक्समध्ये १८० एमएल क्षमतेच्या ४८ बॉटल्स किंमत सात हजार ६८० जप्त करण्यात आल्या. दोन्ही वाहनातील दारूची किंमत तीन लाख १६ हजार रुपये आणि दोन्ही वाहनांची किंमत आठ लाख रुपये आहे.
या प्रकरणी नसीम खान सलीम खान (२२) रा. दहीपुरी कारंजा, अहमद खान युसुफ खान (२८) रा. प्रभात टॉकीजजवळ कारंजा, रवींद्र वासुदेव राठोड (३२) रा. शिक्षक कॉलनी कारंजा, नासीर बेग सफदर बेग (३५), वाईनशॉप मालक रमेश उर्फ मुन्ना रा. कारंजा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक सुरज बेंडे, सारंग मिराशी, पोलीस शिपाई विशाल भगत, संदीप मेहेत्रे, हरीष राऊत यांनी केली.