पावसाअभावी भाजीपाल्याचे दर कडाडले
By admin | Published: July 2, 2017 01:35 AM2017-07-02T01:35:25+5:302017-07-02T01:35:25+5:30
गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. तालुक्यात भाजीपाल्याची आवक घटल्याने ग्राहक हैराण झाले आहे.
उमरखेडमध्ये आवक घटली : दर उतरण्याची शक्यता कमीच, गृहिणींचे बजेट विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहे. तालुक्यात भाजीपाल्याची आवक घटल्याने ग्राहक हैराण झाले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आकाशाकडे टक लावून बसले आहे. पावसाच्या विलंबामुळे भाजीपाल्याचे उत्पादनही घटले आहे. येथील बाजारातील भाजीपाल्याची आवक मंदावली आहे. या सर्वांचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झाला आहे. तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड होते. मात्र यावेळी पावसाअभावी उत्पन्नात घट येत आहे.
तालुक्यात शेवगा, भेंडी, चवळी, वांगी, मिरची, टोमॅटो, फुलकोबी, काकडी, दोडके, कारले, पालक, मेथी, सेपू आदी भाजीपाल्याचे पीक घेतले जाते. हा भाजीपाला दररोज सकाळी खेडोपाडी विक्री करून शेतकरी परिवाराचा गाडा हाकलतात. मागील महिन्यात भाजीपाल्याची आवक जादा असल्याने दरही नियंत्रणात होते. तथापि गेल्या १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने भाजीपाल्याचे दर दुप्पटीने वाढले आहे. सध्या बाजारात भेंडी ६०, शेवगा ८०, चवळी ८०, वांगे ६०, मिरची १२०, कोथिंबीर १६०, टोमॅटो ६०, पालक ६०, फुलकोबी १००, काकडी ६०, दोडके ८०, कारले ८०, मेथी १२०, पानकोबी १४० तर सेपूची भाजी प्रतिकिलो ६० रुपयांप्रमाणे विकली जात आहे. दर वाढल्याने ग्राहक मात्र हैराण झाले आहे.
पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे भाव दुप्पट-तिप्पट झाली. पुढील महिन्यात भाव कमी होण्याची शक्यता आहे.
- बंडू अनखुळे, भाजीपाला विक्रेता
अनेक वर्षांपासून आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करतो. मात्र उत्पन्नात घट आल्याने दर वाढले. भाजीपाल्याची जादा आवक होताच दर कमी होण्याची शक्यता आहे.
- विनोद दुधेवार, भाजीपाला उत्पादक