जनावरे चोरून नेणारे वाहन पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 09:45 PM2018-07-05T21:45:09+5:302018-07-05T21:46:04+5:30

घोन्सा येथील श्रीराम गोरक्षण ट्रस्टमधील पाच जनावरे पिकअप वाहनातून लंपास करत असताना गोरक्षणमधील कर्मचाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. यादरम्यान, पिक वाहन एका झाडावर जाऊन आदळले. काही क्षणातच या वाहनाने पेट घेतला.

The vehicle carrying the thief stole the animals | जनावरे चोरून नेणारे वाहन पेटले

जनावरे चोरून नेणारे वाहन पेटले

Next
ठळक मुद्देगाय होरपळली : पाठलाग करताना घोन्सालगत घडली दुर्घटना, आरोपी फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : घोन्सा येथील श्रीराम गोरक्षण ट्रस्टमधील पाच जनावरे पिकअप वाहनातून लंपास करत असताना गोरक्षणमधील कर्मचाऱ्यांनी या वाहनाचा पाठलाग केला. यादरम्यान, पिक वाहन एका झाडावर जाऊन आदळले. काही क्षणातच या वाहनाने पेट घेतला. मात्र पाठलाग करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वाहनातील जनावरांना सुखरूप बाहेर काढले असले तरी त्यातील एक गाय मात्र गंभीररित्या होरपळली. ही दुर्घटना गुरूवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास रासा ते घोन्सा दरम्यानच्या एका वळणावर घडली.
विशेष म्हणजे यापूर्वीदेखील या गोरक्षणात जनावरे चोरण्याचा प्रयत्न झाला. हे चोरटे वणी येथीलच असल्याची शंका व्यक्त केली जात असून पोलीस चोरट्यांच्या मागावर आहेत. घोन्सा येथे श्रीराम गोरक्षण ट्रस्ट नावाची संस्था असून या संस्थेत तस्करीतून जीवदान मिळालेल्या जनावरांना आश्रय दिला जातो. या गोरक्षणात जवळपास १२५ जनावरे आहेत.
गोरक्षणाला तारेचे कंपाऊंडदेखील आहे. गुरूवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास काही चोरटे पिकअप वाहनासह गोरक्षण परिसरात आले. कंपाऊंडचे तार कापून त्यांनी गोरक्षणात प्रवेश केला. त्यानंतर तेथे बांधून असलेल्या तीन गायी व दोन कालवड अशी पाच जनावरे पिकअप वाहनात बसविली. त्यांना वाहनात निर्दयपणे बांधण्यात आले. या जनावरांना घेऊन हे वाहन घोन्सा मार्गे अदिलाबादकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना या चोरीची भणक गोरक्षणातील कर्मचाऱ्यांना लागताच, त्यांनी या वाहनाचा पाठलाग सुरू केला.
वाहन भरधाव अदिलाबादकडे नेण्यात येत असताना रासा ते घोन्सा मार्गावरील एका वळणावर या वाहनाच्या चालकाचा ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेवरील एका झाडावर सदर वाहन जाऊन आदळले. या अपघातानंतर वाहनातील चोरटे घटनास्थळावरून पसार झालेत. याचवेळी वाहनाने पेट घेतला. ही बाब रात्रीचा भजनाचा कार्यक्रम आटोपून घोन्सा येथे परत जात असलेल्या भजन मंडळातील सदस्यांना दिसली. त्यांनी पुढाकार घेऊन वाहनातील जनावरांना सुखरूप बाहेर काढले. मात्र एक गाय गंभीररित्या जळून जखमी झाली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, वणीचे ठाणेदार बाळासाहेब खाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक काकडे, डी.बी.पथकातील सुधीर पांडे, सुनिल खंडागळे व कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
त्यानंतर वणीच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानंतर वाहनाची आग विझविण्यात आली. या प्रकरणी गोरक्षण ट्रस्टचे अध्यक्ष नरेश हेमंतराव निकम यांच्या तक्रारीवरून भादंवि ३७९, २७९, ४२९, ३४, प्राणी संरक्षण अधिनियम कायदा, मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींची संख्या तीन
जनावरे लंपास करण्यासाठी तीन इसम आले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. सदर इसम हे वणी शहरातीलच असून यापूर्वीदेखील त्यांनी जनावरांची चोरी करण्याचा प्रयत्न केला. जनावरे चोरायची व ती अदिलाबाद येथे नेऊन विकायची, असा या टोळीचा गोरखधंदा आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त वाहनाविना क्रमांकाचे होते.

Web Title: The vehicle carrying the thief stole the animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.