वाहतूक पोलिसांच्या टोर्इंगने वाहनधारकांची तारांबळ

By admin | Published: March 18, 2017 12:45 AM2017-03-18T00:45:33+5:302017-03-18T00:45:33+5:30

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने रहदारीला अडथळा ठरणारी वाहने टोर्इंग व्हॅनद्वारे उचलून नेण्याचा सपाटा लावला आहे.

Vehicle owners' turban with the traffic police traffic | वाहतूक पोलिसांच्या टोर्इंगने वाहनधारकांची तारांबळ

वाहतूक पोलिसांच्या टोर्इंगने वाहनधारकांची तारांबळ

Next

चालकांमध्ये संभ्रम : दुकानांसमोर पिवळे पट्टे नाही, नो-पार्किंगची फलके नाही, पार्किंगला जागा नाही, सांगा, वाहने ठेवायची कुठे?
यवतमाळ : वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने रहदारीला अडथळा ठरणारी वाहने टोर्इंग व्हॅनद्वारे उचलून नेण्याचा सपाटा लावला आहे. परंतु ही टोर्इंग व्हॅन ग्रामीण भागातून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. कारण यवतमाळ शहरात वाहनांसाठी पार्किंगची खास जागा नाही, वाहने कुठे पार्क करू नये याची फलके लागलेली नाहीत, शिवाय दुकानांसमोर वाहनांच्या पार्किंगसाठीचे पट्टेही ओढलेले नाहीत. त्यामुळेच ग्रामीण वाहनधारकांचा गोंधळ उडून त्यांना वाहतूक शाखेच्या कारवाईचा सामना करावा लागत आहे.
वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने टोर्इंगद्वारे वाहने ुउचलण्याच्या सुरू केलेल्या कारवाईचे ग्रामीण जनतेकडून स्वागतच होत आहे. परंतु या कारवाईपूर्वी वाहतूक शाखेने आधी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करावी, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. शहरात पार्किंगसाठी पुरेशी व जवळची जागा उपलब्ध करून द्यावी, तेथे वाहने सुरक्षित राहतील याची हमी घ्यावी, नो-पार्किंगचे ठिकठिकाणी फलक लावावे, बाजारपेठेत दुकानांपुढे वाहनांच्या पार्किंगसाठी रंगीत पट्टे ओढले जावे, कारवाई करताना गरीब-श्रीमंत असा भेदाभेद करू नये, अशी या ग्रामीण वाहनधारकांची मागणी आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांची आपबिती
वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या कारवाईचा फटका बसलेल्या आर्णी येथील अक्षय व दारव्हा येथील शैलेष या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली आपबिती गुरुवारी सायंकाळी ‘लोकमत’कडे कथन केली. वाहतूक शाखेने मोहीम उघडली असली तरी त्यांना त्यासाठी यवतमाळ नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाचे पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचा सूर वाहतूक कर्मचाऱ्यांमधूनच ऐकायला मिळतो आहे.
प्रतिष्ठीतांच्या वाहनांकडे डोळेझाक
वाहतूक पोलीस ग्रामीण भागातील गोरगरीब वाहनधारकांना, परवानाधारक विद्यार्थ्यांना अधिकाधिक दंड देतात तर दुसरीकडे प्रतिष्ठीतांची वाहने नो-पार्किंगच्या फलकासमोर उभी असूनही सर्रास सोडून दिली जात असल्याचा आरोप केला जात आहे. वर्षभराच्या चलान, महसूल व केसेसचे टार्गेट वर्षाच्या सुरुवातीलाच ठरवून दिले जात असल्याने व त्यात दरवर्षी प्रचंड वाढ होत असल्याने वाहतूक पोलीस आधीच त्रस्त आहे. आता मार्च एन्डींगमुळे टार्गेट पूर्ण करायचे असल्याने या पोलिसांचा वाहनधारकांना अडविण्याचा जोर वाढला आहे.
चालकाला उतरवून वाहन जप्त
शुक्रवारी दुपारी तर इंदिरा गांधी मार्केट परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या एका मोटरसायकल चालकाला त्याच्या वाहनावरून उतरुन देऊन त्याचे वाहन टोर्इंगद्वारे जप्त केले गेल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर व्यक्तीची पत्नी खरेदीसाठी दुकानात गेली होती आणि तो वाहनावर बसून त्या दुकानापुढे प्रतीक्षा करीत असताना त्याचे वाहन वाहतूक पोलिसांनी त्याला उतरवून देत ट्रकमध्ये जप्त केले. या अजब कारवाईने उपस्थित सर्वच जण अचंबित झाले.
हॉकर्स-फेरीवाल्याचे काय?
एकीकडे वाहतूक पोलीस शिस्तीच्या नावाखाली थोडीशी रस्त्यावर आलेली वाहने सर्रास टोर्इंग करून उचलून नेत आहेत. तर दुसरीकडे यवतमाळ शहराच्या प्रमुख बाजारपेठेत रस्त्याच्या दुतर्फा हॉकर्स फेरीवाल्यांच्या फळे, भाजी व अन्य वस्तूंच्या लागलेल्या गाड्या अर्ध्या रस्त्यावर आलेल्या आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाई करणे टाळले जात आहे. यवतमाळ शहरातच नव्हे तर लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातही हे चित्र पाहायला मिळते. रस्त्यावरील या विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे अपघात वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. रस्त्यावरील हे अतिक्रमण वाहतूक पोलीस, नगरपरिषद, महसूल व पोलीस प्रशासनासाठी आव्हान ठरले आहे. (प्रतिनिधी)

कार्यकर्त्यांसाठी नेत्यांचा राहतो दबाव
वाहन पकडल्यास व तो राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्यास त्याचे वाहन सोडावे म्हणून बड्या-बड्या नेते मंडळींकडून वाहतूक पोलिसांनाच वाहन सोडण्यासाठी दमदाटी केली जात असल्याची माहिती आहे. वास्तविक या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना वाहन चालविण्याची, परवाना, वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवण्याबाबतची शिस्त लावणे अपेक्षित आहे. मात्र त्याऐवजी ही नेते मंडळी पोलिसांवर वाहन सोडण्यासाठी दबाव आणून आपल्याच कार्यकर्त्यांची शिस्त आणखी बिघडवित असल्याचा सूर पोलीस वर्तुळातून ऐकायला मिळतो आहे.

 

Web Title: Vehicle owners' turban with the traffic police traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.