पांढरकवडा टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 11:31 PM2018-09-16T23:31:53+5:302018-09-16T23:32:22+5:30
पांढरकवडा-केळापूर मार्गावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा-केळापूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्यावर ट्रकच्या रांगांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन धारकाची चांगलीच गोची होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : पांढरकवडा-केळापूर मार्गावर असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर पांढरकवडा-केळापूर रस्त्यावर असलेल्या टोल नाक्यावर ट्रकच्या रांगांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन धारकाची चांगलीच गोची होत आहे. यासंदर्भात ग्राहक प्रहार संघटनेने पांढरकवडा पोलिसांकडे तक्रार केली आहे.
हैदराबादकडे जाताना पांढरकवडा येथून केवळ दोन किलोमिटर अंतरावर टोल नाका असून येथे वाहनाचा वेग कमी होण्यासाठी रस्ता खोदून ठेवला आहे. त्यातच चारही रस्त्यावर टोल वसुलीसाठी मशीन बसविल्या असून ३० ते ४० युवक तैनात असतात. त्यामुळे दुचाकी वाहन चालकाला विनाकारण अडकून पडावे लागते. याबाबत ग्राहक प्रहार संघटनेचे जिल्हा सचिव प्रसाद नावलेकर यांनी टोलच्या व्यवस्थापकाला ही बाब लक्षात आणून दिली. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने नावलेकर यांनी थेट याविषयात पांढरकवडा पोलीस ठाण्याचे निरीक्ष शिवाजी बचाटे यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनी स्वत: पाहणी करून टोल नाक्याच्या व्यवस्थापाला समज दिली. परंतु सुधारणा झाली नाही. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष विलास पवार यांच्याकडे तक्रार केली. त्यांना टोल नाक्याच्या व्यवस्थापकाला प्रहारच्या कार्यालयात बोलावून चांगलीच कान उघाडणी केली.
यावेळी व्यवस्थापकाशी करण्यात आलेल्या चर्चेदरम्यान, रस्ता दुरुस्त करून कार, दुचाकी वाहनांसाठी वेगळा रस्ता राहील, तसे फलक लावण्यात येईल, कोणत्या वाहनासाठी किती टोल लागेल, यासंदर्भात फलक लावण्यात येईल तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार देऊ असे आश्वासन व्यवस्थापकाने दिले. जर या आश्वासनाची पूर्तता झाली नाही, तर तिव्र स्वरूपाचे आंदोलन करून टोल नाका बंद करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पार्टीचे विलास पवार व प्रसाद नावलेकर यांनी दिला आहे.
यापूर्वीदेखील या टोल नाक्याबाबत वाहनधारकांच्या अनेक तक्रारी होत्या. या ठिकाणी अनेकदा टोल कर्मचारी वाहन धारकांसोबत वादही घालतात. हा प्रकार थांबविण्याची मागणी आहे.