रोपे नेणाऱ्या वाहनाचे भाडे मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:35+5:302021-06-16T04:54:35+5:30
महागाव : वनविभागाच्या नांदगव्हाण येथील रोपवाटिकेत खासगी ट्रॅक्टरच्या साह्याने विविध कामे करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाचे पैसे वनविभागाच्या यंत्रणेने परस्पर हडप ...
महागाव : वनविभागाच्या नांदगव्हाण येथील रोपवाटिकेत खासगी ट्रॅक्टरच्या साह्याने विविध कामे करणाऱ्या ट्रॅक्टर मालकाचे पैसे वनविभागाच्या यंत्रणेने परस्पर हडप केले. रात्रंदिवस कष्ट करून वनविभागाकडे शिल्लक राहिलेले पैसे देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्यामुळे ट्रॅक्टर मालक गणेश परसराम राठोड रा. नांदगव्हाण यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
गणेश राठोड हे सातत्याने आपल्या वाहनाचे भाडे मागण्यासाठी वनविभागाच्या पायऱ्या झिजवत आहेत. राठोड यांनी लेखी अर्जाद्वारे उपोषणाचा इशारा दिला आहे. वनविभागाने भाडे तत्वावर लावलेल्या वाहनाचे भाडे स्वतः गिळंकृत केले की काय, अशी शंका व्यक्त केली जात असून मध्यवर्ती रोप वाटिकेच्या कामाची चौकशी करण्याची गरज आहे.
नांदगव्हाण येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत बाहेरून रोपे आणणे, नांगरणी करणे, मुळे काढणे, रोटावेटर करणे, माती, रेती आणि शेणखताची वाहतूक करणे यासाठी गणेश परसराम राठोड यांचे ट्रॅक्टर (क्र.एमएच २९ बीसी ३९७०) कंत्राटी पद्धतीने वनविभागाने भाडेतत्त्वावर वापरले. दरोगा बी.एन. खान आणि वनरक्षक येरवाळ यांच्याशी करार करून गणेश राठोड यांनी २०१९ ते २०२० या काळात आपल्या ट्रॅक्टरने कामे केली. परंतु वर्षभरापासून या कामाचे पैसे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. आपल्या परिश्रमाचे वारंवार पैसे मागूनही मिळत नसल्यामुळे गणेश राठोड यांनी महागाव वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.