शिवसेनेचा विदर्भावर अन्याय; नियुक्त्यांमध्ये वैदर्भीय सैनिकांना स्थान नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 03:05 AM2018-01-25T03:05:42+5:302018-01-25T09:41:49+5:30
शिवसेना नेते-उपनेत्यांच्या निवडीत अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ वगळता अन्य वैदर्भीय लोकप्रतिनिधींपैकी कुणालाही स्थान मिळाले नाही. त्यामुळे विदर्भातील शिवसैनिकांमध्ये ‘मातोश्री’ने अन्याय केल्याची भावना आहे.
यवतमाळ : शिवसेना नेते-उपनेत्यांच्या निवडीत अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ वगळता अन्य वैदर्भीय लोकप्रतिनिधींपैकी कुणालाही स्थान मिळाले नाही. त्यामुळे विदर्भातील शिवसैनिकांमध्ये ‘मातोश्री’ने अन्याय केल्याची भावना आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुंबईत शिवसेनेच्या राष्टÑीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या अनुषंगाने राज्यातील शिवसेनानेते, उपनेत्यांच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या; परंतु या नियुक्त्यांमध्ये मूळ वैदर्भीय एकाही सेना पदाधिकाºयाला स्थान मिळालेले नाही. खा. अडसूळ यांची नेतेपदी नियुक्ती झाली असली, तरी ते मुंबईकर म्हणून ओळखले जातात.
विदर्भात शिवसेनेचे तीन खासदार, चार आमदार आहेत. एके काळी अमरावतीत सेनेचे तीन आमदार व एक खासदार होते. संपूर्ण हयात शिवसेनेत घालविलेले अनेक जण विदर्भात आहेत; परंतु यापैकी कुणावरही शिवसेनानेता किंवा किमान उपनेता पदाची जबाबदारी सोपविली जाऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विदर्भात निष्ठावानांची फौज
१विदर्भात शिवसेनेमध्ये दिग्गज निष्ठावंतांची फौज आहे. यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावनाताई गवळी चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. दिग्रस-दारव्हा मतदारसंघाचे आमदार संजय राठोड राज्यात अजित पवारांनंतर सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. ते महसूल राज्यमंत्रीसुद्धा आहेत. प्रतापराव जाधव हेसुद्धा तिसºयांदा खासदार आहेत.
२याशिवाय माजी खासदार अनंतराव गुढे, माजी राज्यमंत्री अशोक शिंदे, माजी आमदार संजय बंड, विजयराज शिंदे, संजय गावंडे यासारखे कितीतरी निष्ठावंत चेहरे विदर्भातील शिवसेनेत आहेत. पद-प्रतिष्ठेच्या लालसेने कित्येकांनी शिवसेना सोडली; परंतु उपरोक्त मंडळी अजूनही सेनेचा भगवा हाती घेऊन आहेत, असे असताना त्यांची साधी उपनेतेपदावर वर्णी लागू नये, याबाबत शिवसैनिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.