वालीमाईच्या निष्णात हातांनी प्रसवते मातृत्व

By admin | Published: July 9, 2014 11:52 PM2014-07-09T23:52:12+5:302014-07-09T23:52:12+5:30

गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की,

Vermicomposted motherly motherhood | वालीमाईच्या निष्णात हातांनी प्रसवते मातृत्व

वालीमाईच्या निष्णात हातांनी प्रसवते मातृत्व

Next

।। हजारांवर बाळंंतपण : जेवणाचे ताट बाजूला सारत जाते धावून ।।
किशोर वंजारी - नेर
गावात बाळंतपण असले की आठवण होते वालीमाईची. डॉक्टरांना लाजवेल अशा निष्णात हातांनी हजारांवर बाळंतपणं केली. कोणताही मोह नाही की सन्मानाची अपेक्षा नाही. निरोप आला की, पुढचे जेवणाचे ताटही बाजूला सारुन धावून जायचे एवढेच तिला माहीत. हजारो मातांना मातृत्वाचा अत्युच्च आनंद देणारी ही वालीबाई मोहन जाधव आहे नेर तालुक्यातील बोंडगव्हाणची.
बाळंतपण म्हणजे स्त्रीचा पुनर्जन्मच. अशा समयी गरज असते ती निष्णात डॉक्टरांची आणि आपुलकीच्या माणसांची. मात्र आजही ग्रामीण भागात पुरेशा आरोग्य सेवाच पोहोचल्या नाही. वर्षानुवर्ष त्याच त्या समस्या कायम आहे. मात्र या समस्यांवरही ग्रामीण ज्ञानाने मात केली. बाळंतपणासाठी परंंपरागत दाईचीच मदत घेतली जाते. पूर्वापार ज्ञानावर आजही ग्रामीण भागात दाईच सुरक्षित बाळंंतपण करते. नेर तालुक्यातील बोंडगव्हाण येथे ही बाळंतपणात वालीबाई जाधवचाच आधार असतो. आतापर्यंत तिने गावातील हजाराच्यावर बाळंतपण केले. कोणतीही शिक्षण नाही की प्रशिक्षण नाही. मात्र तिचे निष्णात हात डॉक्टरांना लाजवेल, अशा पद्धतीने बाळंतपण करते. ती गावकऱ्यांची आता वालीमाई झाली आहे.
चंद्रमौळी झोपडीत राहणारी वालीबाई आज ७० वर्षाची आहे. दाईचे कोणतीही प्रशिक्षण तिने घेतले नाही. परंतु आई पुतळाबाई हिच्याकडून हा वारसा तिने घेतला. तरुण पणापासून आईसोबत जाऊन तिने बाळंंतपण करण्याची कला अवगत केली. आज ती एवढी निष्णात झाली आहे की, गावकरी एकवेळेस डॉक्टरांवर विश्वास ठेवणार नाही परंतु वालीबार्इंवर ठेवतील. रात्री-बेरात्री कधीही निरोप आला की वालीबाई तेवढ्याच तत्परतेने जाते. यासाठी तिने कधी पैशाचा मोह केला नाही. कुटुंबाला झालेल्या आनंदात जे काही मिळेल ते घ्यायचे आणि आपले घर गाठायचे, असा तिचा शिरस्ता आहे. म्हणूनच आज ती गावकऱ्यांची माई झाली आहे.
आतापर्यंत केलेल्या बाळंंतपणाचे अनुभव कथन करताना वालीबाई सांगते, गेल्या ४० वर्षांपासून गावात दाईचे काम करीत आहे. बाळंतपणानंतर लोक कपडे, धान्य देतात. एवढेच नाही तर पाहुणचारही करतात. परंतु मी कधी अपेक्षा केली नाही. केवळ पोटुशी महिलेची सुटका करायची आणि आनंद पेरायचा एवढेच आपले काम. ४० वर्षाच्या या कामात आपल्याला कधीच वाईट अनुभव आला नाही. आला असेल तर तो मला आता आठवतही नाही. मात्र काही वेळा परिस्थिती गंभीर असते. प्रकरण लक्षात येताच आपण कुटुंबाला डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देते. मात्र अनेकांची परिस्थिती दवाखान्यापर्यंत जाण्याची नसते तेव्हा मग आपले कसब पणाला लावावे लागते. वालीबार्इंनी बाळंंतपण केलेली आज अनेक जण मोठ्या पदावर आहेत. गावातील एकही घर असे नसेल की आपल्या हातून त्या घरचे बाळंंतपण झाले नाही, असे वालीबाई मोठ्या अभिमानाने सांगते. वालीबाईच्या परिवारात पती मोहन जाधव, दोन मुले, दोन मुली आहेत. तीन एकर शेतावर त्यांचे चरितार्थ चालते.
नथणी बक्षीस
बाळंतपणासाठी आपण कोणतीही बिदागी घेत नाही. जे काही दिले त्यावरच समाधान मानते. काही वर्षापूर्वी गावातील नारायण झोड यांच्या मुलीचे आपण बाळंंतपण केले. परिवाराला अत्यानंद झाला. त्यावेळी झोड परिवाराने आठ ग्रॅम सोन्याची नथ दिली. आजही ती नथ वालीबाईच्या नाकात आहे. मोठ्या गर्वाने ती नथणी आजही दाखविते.
सुरक्षित मातृत्व
शासन सुरक्षित मातृत्वासाठी कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. घरापासून रुग्णालयापर्यंत गर्भवती मातेला पोहोचविण्याची व्यवस्था केली जाते. गावागावात आशा स्वयंसेविकांची नियुक्ती केली आहे. मात्र अनेक गावांमध्ये आजही बाळंतपणासाठी दाईचाच आधार घ्यावा लागतो. शासनाने या निष्णात दार्इंना आणखी प्रशिक्षण देऊन मातृत्व सुरक्षा अभियानात सहभागी करण्याची गरज आहे.

Web Title: Vermicomposted motherly motherhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.