शस्त्रक्रियेच्या रुग्णांवर चक्क जमिनीवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:16 AM2018-11-18T00:16:42+5:302018-11-18T00:20:24+5:30
कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागल्याचा खळबळजनक प्रकार पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढे आला आहे.
अब्दुल मतीन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना चक्क जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागल्याचा खळबळजनक प्रकार पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुढे आला आहे. नवजात बालकांसह या महिलांच्या आरोग्याची तर दूर सुरक्षेची दक्षता घ्यायलाही याठिकाणी कुणीही जबाबदार व्यक्ती नव्हता. शुक्रवारी घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमध्ये प्रचंड राग व्यक्त होत आहे.
घाटंजी तालुक्यात असलेल्या पारवा प्राथमिक आरोग्य केंद्राला तब्बल ३५ ते ४० गावे जोडण्यात आली आहे. सुविधांच्या बाबतीत या ‘पीएचसी’ची नेहमीच बोंबाबोंब राहिली आहे. वैद्यकीय अधिकारी यांच्यासह इतर कर्मचारीही रुग्णांना चांगली सेवा देण्याचे सौजन्य दाखवित नाही. आता तर कळस गाठला आहे. शस्त्रक्रिया झालेल्या महिला रुग्णांना दोन पुरुष कर्मचारयांच्या भरवशावर सोडून देण्यापर्यंत मजल गेली आहे.
या प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ १६ बेड आहेत. गुरुवारी २५ महिलांवर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील १६ महिलांना बेड मिळाले. उर्वरित नऊ महिलांना जमिनीवर झोपावे लागले. त्यांच्यासोबत नवजात बालकेही होती. शुक्रवारी तर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास त्यांची सुश्रुषा करण्यासाठीही अधिकारी आणि कर्मचारी नव्हते. चौकीदार आणि एका शिपायावर ही जबाबदारी सोडून अधिकारी व कर्मचारी निघून गेले. याविषयी घाटंजी तालुका आरोग्य अधिकारी विजय उमरे यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी आपली प्रकृती ठीक नसल्याने रुग्णालयात दाखल असल्याचे सांगितले. स्थानिक अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहून सेवा द्यायला पाहिजे, असे ते म्हणाले.
दररोज २०० रुग्णांची तपासणी
पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज १५० ते २०० रुग्णांची तपासणी केली जाते. सोमवारी बाजाराच्या दिवशी ४०० ते ५०० रुग्ण उपचारासाठी येतात. वैद्यकीय अधिकारी त्यांच्या सोयीने पोहोचतात. अत्यवस्थ रुग्णांवर उपचारासाठी तर ते उपयोगीच पडत नाही. त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे या रुग्णालयाचे सफाई कामगार सकाळी १० वाजता पोहोचतात. आरोग्य केंद्र ८ वाजता उघडले जाते. १० वाजेपर्यंत स्वच्छताच होत नाही. या आरोग्य केंद्राला स्वत:ची रुग्णवाहिका नाही. या सर्व प्रकाराकडे वरिष्ठ आरोग्य अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष सुरू आहे.
वैद्यकीय अधिकारी कमालीचे उदासीन
पारवा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर आहेत. पैकी एक जागा भरली आहे. डॉ. संजय पुराम यांच्याकडे या पदाची जबाबदारी आहे. ते घाटंजीहून काम सांभाळतात. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी याठिकाणी सुसज्ज अशी निवासस्थाने बांधली आहे. त्याचा उपयोग अधिकारी आणि कर्मचारी घेत नाहीत. आरोग्य सेवेविषयी त्यांची कमालीची उदासीनता आहे.
थंडीत कुडकुडत काढली रात्र
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या रुग्णाला तीन दिवस रुग्णालयात दाखल ठेवले जाते. थंडीचे दिवस असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्राने त्यांच्यासाठी आवश्यक त्या वस्तू उपलब्ध करून देणे गरजेचे होते. मात्र प्रसूत आणि शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना तीन दिवस कुडकुडत जमिनीवर रात्र काढावी लागली. शिवाय नवजात बालकांचेही प्रचंड हाल झाले. सोबत असलेल्या नातेवाईकांची तर झोप उडाली होती. या आरोग्य केंद्राचा संपूर्ण परिसर झुडपांनी व्यापला आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा संचार याठिकाणी आहे. सुरक्षेच्यादृष्टीनेही आरोग्य प्रशासनाने उपाययोजना केल्या नाहीत.