दिग्रसमध्ये दिग्गज आमने-सामने, २० वर्षापूर्वीही संजय राठोड विरुद्ध माणिकराव ठाकरे झाली होती लढत
By विशाल सोनटक्के | Published: November 8, 2024 07:46 AM2024-11-08T07:46:05+5:302024-11-08T07:46:44+5:30
Maharashtra Assembly Election 2024: दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान मंत्री संजय राठोड तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला आहे.
- विशाल सोनटक्के
यवतमाळ - दिग्रस विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान मंत्री संजय राठोड तर महाविकास आघाडीकडून माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना रंगला आहे.
सलग चार वेळा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे माणिकराव ठाकरे यांचा पराभव २००४ च्या निवडणुकात त्यावेळी नवख्या असलेल्या संजय राठोड यांनी केला होता. त्यानंतर २००९, २०१४ व २०१९ अशा सलग तीन निवडणुकांत विजयाची हॅट्ट्रिक साधत संजय राठोड मोठ्या मताधिक्याने विजयी होत गेेले. यंदा महाविकास आघाडीकडून नेर नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या उमेदवारीची घोषणा झाली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी यात दुरुस्ती करून माणिकराव ठाकरे यांना मैदानात उतरविण्यात आले. दोन दिग्गज उमेदवारांमुळे यंदा दिग्रसमधील लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
विद्यमान मंत्री महायुतीचे उमेदवार संजय राठोड विरुद्ध माजी मंत्री महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यात चुरशीचा सामना होत आहे. पाच वर्षात केलेली कामे संजय राठोड सांगत आहेत. तर महागाई, शेतमालाच्या भावावरून माणिकराव ठाकरे त्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे.
लोकसभेमध्ये काय घडले, परिणाम काय?
- लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे संजय देशमुख विजयी झाले. त्यांनी महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांचा ९४ हजार ४७३ मतांनी पराभव केला.
- लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेचे संजय राठोड यांच्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांना तब्बल ८ हजार ६६७ इतके मताधिक्य मिळालेले आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
मतदारसंघातील दारव्हा, दिग्रस आणि नेर या तीन तालुक्यात एमआयडीसी आहे, परंतु एकही मोठा उद्योग नाही. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न आहे.
अडाण, मध्यम प्रकल्प तसेच अरुणावती प्रकल्प जुने झाले असून कॅनाॅल नादुरूस्त असल्याने सिंचनाचे अपेक्षित क्षेत्र गाठले जात नाही.