पशुवैद्यकीय दवाखान्यांना लागली अखेरची घरघर, कर्मचाऱ्यांचीही अनेक पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:39 AM2021-08-29T04:39:50+5:302021-08-29T04:39:50+5:30
तालुक्यातील जनतेचे उपजीविकेचे एकमेव साधन शेती आहे. त्यामुळे शेती व पशुपालन हा तालुक्यातील नागरिकांचा मुख्य धंदा आहे. अनेक शेतकरी ...
तालुक्यातील जनतेचे उपजीविकेचे एकमेव साधन शेती आहे. त्यामुळे शेती व पशुपालन हा तालुक्यातील नागरिकांचा मुख्य धंदा आहे. अनेक शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. तालुक्यात १० हजारांच्या वर पशुसंख्या आहे. तालुक्यात पशूंची मोठी संख्या पाहता मारेगाव, बोटोणी, कुंभा, मार्डी येथे श्रेणी १ चे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, तर पेंढरी, हिवरा-मजरा, वसंतनगर आदी चार ठिकाणी श्रेणी २ चे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत, तर संपूर्ण तालुक्यासाठी एक फिरते रुग्णालय आहे. चार दशकांपूर्वी स्थापन झालेल्या पशू रुग्णालयातून तालुक्यातील पशुपालकांना उत्तम सुविधा पुरविल्या जात होत्या; परंतु आता मात्र पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सेवेला अखेरची घरघर लागल्याचे चित्र तालुक्यात आहे. तालुक्यातील श्रेणी १ ची चार पशुवैद्यकीय दवाखाने आणि एका फिरत्या दवाखान्यासाठी सध्या एकमात्र डॉक्टर आहे. त्यातही त्यांच्याकडेच पंचायत समिती विस्तार अधिकाऱ्यांचा प्रभार आहे. त्यामुळे पाच दवाखाने सांभाळून विस्तार अधिकाऱ्यांची सर्कस ते कसे सांभाळतात, हे एक आश्चर्यच आहे. श्रेणी २ च्या चार दवाखान्यांसाठी तीन डॉक्टर सध्या उपलब्ध आहेत, तर दवाखान्यातील सहायक कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यातच पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे बहुतांश वेळा ही रुग्णालये बंदच असतात. यामुळे पशूंना योग्य सेवा देण्यात ही रुग्णालये कुचकामी ठरत आहे.
बॉक्स :
बोगस डॉक्टरचा अघोरी उपचार
पशुवैद्यकीय क्षेत्राचे जुजबी ज्ञान असलेले अनेक बेरोजगार तरुण आता तालुक्यात डॉक्टर बनून वावरत आहेत. स्वत:च्या वाहनाने पशुपालकांच्या घरोघरी जाऊन हे बोगस डॉक्टर अघोरी उपचार करतात. यात अगदी शस्त्रक्रिया करण्यापर्यंत त्यांची हिंमत गेली आहे. मेडिकल दुकानदाराकडून कमिशन घेऊन भरमसाठ औषधी दिल्या जात आहेत. यात बऱ्याचदा जनावरे दगावतात; पण याची कुठेच तक्रार होत नसल्याने मनमानी सुरू आहे. तालुक्यातील शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालयात पशूंवर मोफत उपचारासाठी येणारी महागडी औषध यांच्याकडे असतात. या बोगस डॉक्टरांना ही औषध मिळतेच कशी, हा एक प्रश्न आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. यात फार मोठे घबाड हाती लागणार आहे.