उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ४ जानेवारीला यवतमाळमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 10:37 AM2021-12-19T10:37:07+5:302021-12-19T10:48:42+5:30

उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे ४ जानेवारी रोजी यवतमाळ दाैऱ्यावर येत आहेत. ४ जानेवारीला हवाईदलाच्या विशेष विमानाने सकाळी ९.१५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल.

Vice President Venkaiah Naidu in Yavatmal on January 4th | उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ४ जानेवारीला यवतमाळमध्ये

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू ४ जानेवारीला यवतमाळमध्ये

Next
ठळक मुद्देमहात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरणमातोश्री वीणादेवी दर्डा स्कूलच्या नवीन इमारतीचेही करणार उद्घाटन

यवतमाळ : भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू हे ४ जानेवारी रोजी यवतमाळ दाैऱ्यावर येत आहेत. जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटी यवतमाळद्वारा संचालित लोहारा येथील मातोश्री वीणादेवी दर्डा स्कूलच्या नवीन इमारतीचे उद्घाटन तसेच हनुमान आखाडा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरणही नायडू यांच्या हस्ते होणार आहे.

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे ४ जानेवारी रोजी हवाईदलाच्या विशेष विमानाने सकाळी ७.१० वाजता नागपूरकडे निघतील. सकाळी ९.१५ वाजता त्यांचे नागपूर विमानतळावर आगमन होईल. तेथून ९.२५ वाजता हवाईदलाच्या विशेष हेलिकाॅप्टरने ते वर्धा-सेवाग्रामकडे निघतील. सकाळी ९.५५ वाजता महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात त्यांचे आगमन होईल. तेथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि नव्याने बांधण्यात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी भवन आणि चंद्रशेखर आझाद वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सकाळी १०.१५ ते ११.३० या वेळेत उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता सेवाग्राम येथून हेलिकाॅप्टरने ते यवतमाळकडे रवाना होतील.

यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा विमानतळावर दुपारी १२.१५ वाजता त्यांचे आगमन होईल. दुपारी १२.२० वाजता ते विमानतळावरून वीणादेवी दर्डा स्कूलकडे निघून १२.३५ ते १ या वेळेत मातोश्री वीणादेवी दर्डा स्कूलचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते होईल. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक तथा ‘लोकमत’ मीडिया ग्रुपचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा राहणार आहेत. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादनमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’ मीडिया ग्रुपचे एडिटर-ईन-चीफ राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती असेल. सीबीएसई मान्यता प्राप्त मातोश्री वीणादेवी दर्डा स्कूलची भव्य आणि देखणी वास्तू निसर्गरम्य वातावरणात उभारली असून, यवतमाळ जिल्ह्यातील ही पहिली डे-बोर्डिंग शाळा असणार आहे. येथे १५०० विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेऊ शकतील. यासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

प्रेरणास्थळ, तुलसीवृंदावनवर वाहणार पुष्पांजली

वीणादेवी दर्डा स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू दुपारी १.०५ ते २.४५ या वेळेत विजय दर्डा यांच्या दर्डा उद्यानातील निवासस्थानी थांबणार असून, त्यानंतर स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे समाधीस्थळ असलेल्या प्रेरणास्थळ आणि मातोश्री वीणादेवी दर्डा यांचे समाधीस्थळ असलेल्या तुलसीवृंदावन येथे पुष्पांजली वाहणार आहेत. येथे उपराष्ट्रपती नायडू यांच्याहस्ते ‘लोकमत’ नागपूर आवृत्तीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त काढलेला विशेषांक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात येणार आहे.

यवतमाळचा हनुमान आखाडा ऐतिहासिक

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याहस्ते ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता येथील ऐतिहासिक हनुमान आखाडा येथे उभारलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रख्यात शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांनी या पुतळ्याची निर्मिती केली आहे. यवतमाळच्या इतिहासात या आखाड्याची वेगळी ओळख आहे. १९१७ मध्ये स्थापन झालेल्या या ब्रिटिशकालीन आखाड्याला १०४ वर्षे झाली आहेत. हनुमान आखाडा येथील या कार्यक्रमानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळाकडे प्रस्थान करतील. तेथून हवाईदलाच्या विशेष हेलिकाॅप्टरने ३.४५ वाजता त्यांचे नागपूरकडे प्रस्थान होईल.

Web Title: Vice President Venkaiah Naidu in Yavatmal on January 4th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.