डॉक्टरांच्या ‘तू तू-मै मै’मध्ये गेला तीन रुग्णांचा बळी; संतप्त नातेवाईकांचा कारवाईसाठी ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 05:24 PM2021-09-20T17:24:16+5:302021-09-20T17:25:00+5:30
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्रपाळीत कामावर असलेल्या दोन डॉक्टरांनी आपसात वाद घातला. या वादात चक्क एका रुग्णाचा जीव गेला. त्याच वेळी इतर दोन रुग्णही दगावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्रपाळीत कामावर असलेल्या दोन डॉक्टरांनी आपसात वाद घातला. या वादात चक्क एका रुग्णाचा जीव गेला. त्याच वेळी इतर दोन रुग्णही दगावले. हा गंभीर प्रकार शनिवारी मध्यरात्रीनंतर घडला. या गंभीर प्रकाराने संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी दोषी डॉक्टरांवर कठोर कारवाई होण्यासाठी आंदोलन केले. अखेर वैद्यकीय अधिष्ठाता यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय घडी विस्कटली आहे. येथील डॉक्टरांवर, नर्सेसवर कुणाचा अंकुश नाही, त्यामुळेच गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णावर उपचार करण्याऐवजी चक्क तो माझा रुग्ण नाही, असे म्हणत हेटाळणी करण्यात आली. यात या रुग्णाचा जीव गेला. संजय विलास दरांडे (१६) रा. शिवाजीनगर लोहारा असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे. यासोबतच इतर दोन रुग्णही दगावले. मात्र ते वयोवृद्ध असल्याने त्यांच्या मृत्यूबाबत तक्रारी झाल्या नाहीत.
संजय दरांडे याला सिकलसेल हा आजार होता. त्याची प्रकृती बरी नसल्याने शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता संजयला त्याची आई रत्नमाला दरांडे यांनी शासकीय रुग्णालयात आणले. येथे मेडिसीन व सर्जरी या दोन विभागातील डॉक्टरांनी वाद सुरू केला. मेडिसीन विभागातील डॉक्टर हा रुग्ण आमचा नसून त्याला सर्जरी वार्डात दाखल करा असे म्हणू लागले. तर सर्जरी वॉर्डातील डॉक्टरांनी आम्ही सिकलसेल असलेल्या रुग्णावर उपचार करूच शकत नाही, त्याचा येथे मृत्यू होईल, असे सांगून हात वर केले. दोन्ही विभागातील डॉक्टरांची टोलवाटोलवी पहाटे ३ वाजेपर्यंत सुरू होती. यातच संजयला रक्ताची उलटी झाली. त्याची प्रकृती आणखी गंभीर झाली. सकाळी त्याचा उपचाराअभावीच रुग्णालयात मृत्यू झाला.
याच वादात दोन इतर रुग्णही दगावले. यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी थेट आंदोलनाचा पवित्रा घेतला. दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत संजयच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्याची आई रत्नमाला विलास दरांडे व त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश बेलोकर यांनी हा मुद्दा उचलून धरला. प्रकरण अंगाशी येणार हे लक्षात आल्यानंतर वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे व शहर ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांनी दरांडे कुटुंबीयांची भेट घेतली. दोषी डॉक्टरांविरोधात सात दिवसात कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतरच संजयचा मृतदेह ताब्यात घेऊन कुटुंबीयांनी त्यावर अंत्यसंस्कार केले.
हे प्रकरण अतिशय गंभीर असून न्यायवैद्यक शास्त्र विभाग प्रमुखांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठित केली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. कुणाचीही गय करण्यात येणार नाही.
- डॉ. मिलिंद कांबळे,
अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय