दुभाजकावरील पथदिव्यांनी घेतला कंत्राटदाराचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 09:55 PM2019-04-20T21:55:00+5:302019-04-20T21:55:54+5:30
आर्णी मार्गावर रस्ता दुभाजकाच्या मध्ये पथदिवे लावले आहे. त्याला केबलद्वारे वीजजोडणी केली आहे. या कामामध्ये अक्षम्य त्रृटी आहेत. अखेर या चुकांमुळेच मोठे वडगाव परिसरात रस्त्याच्या दुभाजकात टाकलेल्या वीज केबलवर पाय पडून बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आर्णी मार्गावर रस्ता दुभाजकाच्या मध्ये पथदिवे लावले आहे. त्याला केबलद्वारे वीजजोडणी केली आहे. या कामामध्ये अक्षम्य त्रृटी आहेत. अखेर या चुकांमुळेच मोठे वडगाव परिसरात रस्त्याच्या दुभाजकात टाकलेल्या वीज केबलवर पाय पडून बांधकाम कंत्राटदाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली.
मोहन कृष्णराव कावरे (४०) रा. शांतीनगर वडगाव असे या कंत्राटदाराचे नाव आहे. मोहन कावरे हे बांधकाम मटेरियल सप्लायर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या घरी कलरिंगचे काम सुरू होते. कलर विकत घेण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका दुकानात जाण्यासाठी निघाले. त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेले रेलिंग पार करण्याचा प्रयत्न केला. यातच त्यांचा पाय उघड्या पडलेल्या वीज केबलवर पडला. काही काळ एकाच जागी उभे असल्याचे लक्षात येताच परिसरातील लोकांनी काठीने कावरे यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांच्या पायाखाली जिवंत विद्युत केबल उघडी पडल्याचे दिसून आले. कावरे यांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कावरे यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
दुभाजकाच्या मधोमध पथदिवे लावण्यात आले आहे. यासाठी केबल टाकली आहे. हे काम पूर्ण होण्याअगोदरच केवळ निवडणूक काळात झगमगाट दाखविण्यासाठी त्यातून विद्युत प्रवाह सोडण्यात आला.
राजकीय स्वार्थासाठी विकास दाखविण्याची धडपड सुरू आहे. त्यामुळे कंत्राटदारावरही कोणाचेच नियंत्रण नाही. गुणवत्तेपेक्षा चमकोगिरीला महत्व आल्याने याची मोठी किंमत अशा अपघातातून मोजावी लागली.
दोषींवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी वडगाव परिसरातील ग्रामस्थांनी केली. यावेळी प्रवीण देशमुख, अरुण राऊत, संजय लंगोटे, बालू पाटील दरणे, विजय काळे, राजू केराम, राजू गिरी, अनिल गायकवाड, कैलास बावणे, सय्यद जाकीर, विजय बडगे, विनोद रोकडे, अमजद पठाण, संदीप कुचनकर, विनायक बोंद्रे, विजय काळे, नरेश ढोले, दिनेश गोगरकर आदी उपस्थित होते.