यवतमाळ जिल्ह्यातील शंकर व माधव ठरले व्यवस्थेचे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:25 AM2018-04-18T11:25:51+5:302018-04-18T11:25:58+5:30
यवतमाळ जिल्ह्यात शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले.
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शंकर चायरे यांनी थेट पंतप्रधानांना जबाबदार धरुन आणि माधव रावते यांनी स्वत:चे सरण रचून आत्महत्या केली. जिल्ह्यात झालेल्या या दोन शेतकरी आत्महत्यांनी संपूर्ण राज्य हादरुन गेले. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने या दोघांनी जगाचा कायमचा निरोप घेतला. कोट्यवधींची कर्जमाफी देऊनही शेतकऱ्यांच्या परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही, हेच या दोन आत्महत्यांनी सिद्ध केले. तर अनेक शेतकरी हातात विषाचा प्याला घेऊन फिरत आहे. त्यांना वेळीच सावरले नाही तर मृत्यूचे तांडव असेच सुरू राहणार.
यवतमाळ हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध जिल्हा. शेकडो शेतकऱ्यांनी नापिकी आणि कर्जबाजारीपणाने आत्महत्या केल्या. शासन बदलले, प्रशासन गतिमान झाले, विविध शासकीय योजना आल्या. परंतु शेतकऱ्यांच्या परिस्थितीत तसूभरही फरक पडला नाही.
कोट्यवधींच्या योजना आणि पॅकेज येऊनही शेतकऱ्यांच्या दारापर्यंत त्याचा लाभच गेला नाही. अलिकडेच शेतकरी सन्मान योजनेतून कर्जमाफी दिली. मात्र या कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाही. अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच मिळाला नाही.
शेतकरी दररोज बँकांचे उंबरठे झिजवून कर्जमाफीच्या यादीत आपले नाव शोधत आहे. आपल्या बरोबरीच्या शेतकऱ्यांची नावे कर्जमाफीच्या यादीत आहे. आपलेच नाव का नाही, अशातूनही शेतकरी निराश होत आहे.
घाटंजी तालुक्यातील राजूरवाडी येथील शंकर भाऊराव चायरे या शेतकऱ्याने पंतप्रधानांच्या नावे थेट चिठ्ठी लिहून आपल्याला कर्जमाफीचा फायदा झाला नाही, त्यामुळेच आपण आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री आल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही, अशी भूमिका कुटुंबाने घेतल्याने तीन दिवस मृतदेह शवागारात होता. तीन दिवसानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशासनाने सोपस्कार पार पाडले.
कुटुंबियांची समजूत काढण्यात यश मिळविले. शंकरची चिता धगधगत असताना उमरखेडच्या इवळेश्वर येथील माधव रावते यांनी स्वत:च सरण रचून आत्महत्या केली. कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने निराश झालेल्या या वृद्धावर आयुष्याच्या सायंकाळी अशी दुर्दैवी वेळ आली. दोन दिवसानंतर या आत्महत्येला वाचा फुटली. शासन-प्रशासन हादरुन गेले.
जिल्ह्यात शंकर आणि माधव सारखे अनेक शेतकरी आहे. त्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आॅनलाईनच्या जाचातून आणि विविध प्रक्रियेतून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होत नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी, त्यांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने दिलेली कर्जमाफीतील त्रुटी आता शेतकऱ्यांच्या जीवावर तर उलटत नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.