इचोरात महिलेचा बळी तर घुईत ग्रामसेवकाला कोंडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 09:36 PM2018-02-28T21:36:08+5:302018-02-28T21:36:08+5:30

यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले.

The victim's wife died in Goregaon | इचोरात महिलेचा बळी तर घुईत ग्रामसेवकाला कोंडले

इचोरात महिलेचा बळी तर घुईत ग्रामसेवकाला कोंडले

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात पाणी पेटले : थकीत वीज बिलाने कृत्रिम पाणीटंचाई

ऑनलाईन लोकमत
आर्णी/सोनखास : यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईने उग्ररुप धारण केले असून आर्णी तालुक्यातील ईचोरा येथे पाण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. तर नेर तालुक्यातील सोनखास येथे संतप्त गावकऱ्यांनी पाण्यासाठी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. यावरून जिल्ह्यातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव पुढे येत आहे.
आर्णी तालुक्यात पाणीटंचाईने पेट घेतला आहे. अनेक गावात पाणी असतानाही वीज वितरणने खंडित केलेल्या वीज पुरवठ्याने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या कृत्रिम पाणीटंचाईने महिलेचा बळी घेतला. इचोरा येथील शांताबाई उर्फ शेवंतीबाई डोमा पवार (५०) या महिलेचा बुधवारी पहाटे ५ वाजता गावानजीकच्या शिवारातील विहिरीत पडून मृत्यू झाला. इचोरा येथील ग्रामपंचायतीकडे वीज वितरणचे सात लाख रुपये थकीत आहे. त्यामुळे दहा दिवसापूर्वी या गावातील पाणीपुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. सर्व कामधंदे सोडून नागरिक शेतशिवारातून पाणी आणत आहे. अशाच बुधवारी पहाटे ५ वाजता शांताबाई पवार स्मशानभूमीजवळील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. पहाटेची वेळ असल्याने ती एकटीच पाणी भरत होती. त्यावेळी तिचा तोल गेला असावा आणि ती दोर-बादलीसह विहिरीत पडली. सकाळी ७ वाजताच्या सुमारास विहिरीच्या काठावर काही नागरिकांना रिकामा गुंड दिसला. परंतु तेथे कुणीच नव्हते. त्यामुळे विहिरीत डोकावून बघितले असता एक महिला विहिरीत पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी धाव घेतली. तेव्हा शांताबाई पवार यांचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याचे पुढे आले.
इचोरा गावात भरपूर पाणी आहे. परंतु नियोजनाअभावी गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत सरपंच संदीप वंजारे यांना विचारले असता कर वसुली नसल्यामुळे आम्ही बिल भरु शकलो नाही. ग्रामसेवकही गावात येत नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी सी.जी. चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १४ व्या वित्त आयोगातून पूर्वी पैसे वापरण्याची तरतूद होती. परंतु आता शासनाने नियम बदलविले आहे. यातून रक्कम वळविता येत नसल्याचे सांगितले.
नेर तालुक्यातही पाणीटंचाई उग्र झाली आहे. गावागावात पाण्यासाठी नागरिक संतप्त आहे. घुई येथेही महिनाभरापासून नागरिक पाणीटंचाईचा सामना करीत आहे. ग्रामसेवक कोणत्याही उपाययोजना करीत नाही. दरम्यान बुधवारी सकाळी १२ वाजता ग्रामसेवक मनोहर मालखेडे १५ दिवसानंतर गावात आले. गावकऱ्यांनी पाण्याचा प्रश्न त्यांच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामसेवकाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला चक्क ग्रामपंचायत कार्यालयातच कोंडले. त्यानंतर या घटनेची माहिती लाडखेड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तासाभराने ग्रामसेवकाची सुटका केली. महिलांनीही या ग्रामसेवकाला चांगलेच धारेवर धरले. दरम्यान विस्तार अधिकारी आर.डी. डाबरे यांनी गावाला भेट दिली. यावेळी सरपंच अरुणा आडे व उपसरपंच नरेश राठोड उपस्थित होते.
आर्णी पंचायत समिती सभापतींचेच गाव तहानलेले
आर्णी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत शंकरलाल जाधव हे तालुक्यातील इचोरा गावचे रहिवासी आहे. संपूर्ण पंचायत समितीचा कारभार पाहणाऱ्या सभापतीच्याच गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. त्यामुळे एका महिलेचा बळी गेला. असे किती बळी जाणार असे म्हणत इचोरा येथील नागरिकांनी बुधवारी संताप व्यक्त केला.

Web Title: The victim's wife died in Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी