फार्मर कप स्पर्धेतून विदर्भातील तालुके वगळले
By रूपेश उत्तरवार | Published: May 30, 2023 11:27 AM2023-05-30T11:27:23+5:302023-05-30T11:28:44+5:30
पाणीदार गावे झाली उजाड : गावकरी म्हणतात आमचे चुकले कुठे
रूपेश उत्तरवार
यवतमाळ : गावांमध्ये जलसमृद्धी आणण्याचे काम वॉटर कप स्पर्धेने हाती घेतले होते. यामध्ये वाहते पाणी थांबविणे आणि ते जमिनीत मुरविणे या दोन मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. राज्यातील अनेक गावांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. पाणी टंचाई भासणारी गावे यातून पाणीदार होण्यास सुरुवात झाली होती. जलसमृद्ध गावे विकासाच्या दिशेने पाऊल टाकत असताना यंदा मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक तालुक्यांना यातून वगळण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर आहे.
कृषी विभाग आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात तीन वर्षांपासून वॉटर कप स्पर्धा घेतली जात होती. २०१७ ते २०२१ या कालावधीत ही योजना गाव पातळीवर राबविण्यात आली. या योजनेला नागरिकांचा प्रचंड लोकसहभाग मिळाला. यातील अनेक गावांना १० लाख रुपयांचे प्रथम बक्षिसही मिळाले. यातून गावात विकासकामे झाली. पाणी बचतीवर नागरिकांनी भर दिला. गावे पाणीदार होण्यास मदतही मिळाली.
आता वॉटर कप स्पर्धेचे स्वरूप बदलले आहे. या स्पर्धेला यंदा ‘फार्मर कप’ असे नाव देण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांसोबत ‘पाणी बचत’ या विषयावर काम केले जात आहे. १८ महिन्यांच्या या स्पर्धेत सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, जैविक कीड नियंत्रण या विषयांवर भर देण्यात आला. ही स्पर्धा शेतकऱ्यांनी आपल्या पातळीवर राबवायची आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतानाही या स्पर्धेतून या ठिकाणच्या अनेक जिल्ह्यांना, काही तालुक्यांना वगळण्यात आले आहे. परिणामी, विदर्भ आणि मराठवाड्यातील वॉटर कप स्पर्धेत विजयी झालेली गावे या स्पर्धेत राहिली नाहीत.
या गावांना फार्मर कप स्पर्धेत सहभागी केले असते, तर काही नवे बदल घडविता आले असते. त्यातून शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असता. आता या स्पर्धेत या गावांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
असे आहेत वगळलेले जिल्हे
या स्पर्धेतून संपूर्ण यवतमाळ आणि नांदेड जिल्हा वगळण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांतील तालुके यात नोंदविण्यात आले आहेत. यामध्ये अमरावतीमधील वरूड, वर्धेतील आर्वी, अकोलामधील बार्शीटाकळी आणि वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर, कारंजा तालुका घेण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांचा यात समावेश आहे. इतर तालुक्यांना वगळण्यात आले आहे. यामुळे स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गावांची निराशा झाली आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील ५४७ गावांकडे पाठ
या योजनेत तीन वर्षांत यवतमाळ जिल्ह्यातील ५४७ गावांनी सहभाग नोंदविला होता. यात सहा तालुक्यांतील ४६ गावे विजयी झाली होती. त्यांना प्रत्येकी १० लाखांची बक्षीस रक्कम मिळाली. ही सर्व गावे नवीन स्पर्धेतून वगळण्यात आली आहेत.
वॉटर कप स्पर्धेत सर्वच ठिकाणचा उत्तम प्रतिसाद राहिला. अनेक ठिकाणी पाण्याची साठवण क्षमता वाढली. आजही या ठिकाणी काम होत आहे. आता नवीन स्पर्धेत या गावांचा समावेश नाही.
- अशोक बगाडे, माजी जिल्हा समन्वयक, वॉटर कप स्पर्धा.