विदर्भात दिवाळीत तापमान जाणार ३० अंशांखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 08:49 PM2021-10-30T20:49:25+5:302021-10-30T20:49:51+5:30
येत्या दोन दिवसांत विदर्भात कमाल तापमान ३० अंशांपेक्षाही कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
यवतमाळ : जिल्ह्यात ऑक्टोबर अखेरीस थंडीने चांगलाच जोर धरला आहे. इतर वेळी ४० अंशांच्या जवळपास असणारे जिल्ह्याचे कमाल तापमान आता चक्क ३२ अंशांपर्यंत उतरले असून, किमान तापमान १५ अंशांपेक्षाही कमी आहे. विशेष म्हणजे येत्या दोन दिवसांत कमाल तापमान ३० अंशांपेक्षाही कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
सध्या दिवसाचे तापमान किंचित सुसह्य असले तरी सूर्यास्त होताच थंडीची हुडहुडी वाढत आहे. १ नोव्हेंबरपासून हे तापमान आणखी कमी होण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. त्यामुळे आता खरीप हंगामातील तुरीचे पीक बहरलेले असताना ही थंडी तुरीच्या पिकासाठी उपयुक्त ठरणार आहे. थंडीमुळे सध्या जागोजागी शेकोटी पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, तर सर्दी, तापाचे रुग्णही वाढत आहेत.